सातारा : भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारामध्ये नव्या चेहर्यांना संधी देण्याचे संकेत प्रदेश कार्यकारिणीने दिले आहे. मंडल आणि बूथ प्रमुखांच्या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार हा कळीचा मुद्दा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सातारा जिल्ह्यात पक्षाने सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाचे धोरण ठेवले आहे.
जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये लोकसभा संयोजक सुनील काटकर, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रवी पवार व दत्ताजी थोरात जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत फाळके यांची नावे चर्चेत आहेत. मात्र ज्यांनी पक्षासाठी तीस वर्षे दिली असे दत्ताजी थोरात व रवी पवार या निष्ठावंतांना न्याय मिळावा, ही अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीने बूथ, मंडल, जिल्हा कार्यकारणी व प्रदेश अशा चार टप्प्यांमध्ये मजबूत संघटन करण्याचा प्रयत्न केला. येत्या ऑक्टोबर मध्ये सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर 16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू होत आहेत. त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणीचे धोरण ठेवले आहे.
कराड उत्तर मध्ये मनोज घोरपडे आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्यातील अंतर्गत खदखद अद्याप संपलेली नाही. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पॅनल विरोधात पडलेले दुसरे पॅनल यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला. प्रदेश कार्यकारिणीने यावर अद्याप भाष्य केले नाही तरी त्याची दखल मात्र निश्चित घेतली आहे. संघटनात्मक परिस्थितीमध्ये काम करताना कुठे कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे. प्रदेश कार्यकारिणीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याच गोष्टींवर भर दिलेला आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील यश भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे. त्यामुळे संघटन बांधणीसह जुन्या निष्ठावंतांसह नव्या चेहर्यांना बरोबर घेऊन जाणार्या दमदार जिल्हाध्यक्षाची भाजपला नितांत गरज आहे. त्यामुळे यंदा नवीन चेहर्याला संधी मिळणार, की भाजपचे निष्ठावंत यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.