दिल्ली : रामलीला मैदानावर INDIA आघाडीची महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही बेकायदेशीर आणि चोरलेली निवडणूक होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
राहुल गांधी म्हणाले की, २०२४ ची निवडणूक चोरीची होती, हे आपण नव्हे, तर निवडणूक आयोगच सांगत आहे. लाखो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. कोविडच्या काळातही काँग्रेस पक्षाने काही गोष्टींबाबत इशारा दिला होता आणि नंतर त्या खऱ्या ठरल्या, असा दावाही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ही सामान्य चोरी नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराची चोरी आहे. ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह केंद्रीय गृहमंत्री झाले, असाही आरोप त्यांनी केला.
या सभेत राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यावरूनही केंद्र सरकारला लक्ष्य केलं. या देशात अदानी-अंबानी यांचं कर्ज दोन मिनिटांत माफ होतं; मात्र एखाद्या गरीब कुटुंबातील मुलाने कर्ज घेतलं, तर त्याला अपमान सहन करावा लागतो आणि तुरुंगात जावं लागतं, असं ते म्हणाले. आपल्याला अशी व्यवस्था नको, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वसामान्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळायला हवा, अशी भूमिकाही राहुल गांधी यांनी मांडली. शेतकऱ्याच्या मुलाने मेहनत केली किंवा विद्यार्थ्याने १८ तास अभ्यास केला, तर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे, असं ते म्हणाले.
देशातील विमानतळ, रेल्वे, वीज व्यवस्था, ड्रोन आणि शस्त्रास्त्र क्षेत्रावर काही मोजक्या उद्योगपतींचं नियंत्रण असलेली व्यवस्था आपल्याला मान्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी सर्वात आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणं गरजेचं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल; राहुल गांधी यांचा इशारा
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा