सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर आणलेल्या 500 कोटींच्या आरोपांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व संपवण्याचा हा डाव असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते पैसे मनोज जरांगे पाटील यांना दिले, असा आरोप या कथित ऑडिओ क्लिपमधून करण्यात आल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची ऑडिओ क्लिप माध्यमांना ऐकवली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. यातील थोडं जरी खरं असलं तर मग हा महाराष्ट्र कुठे कुठे चाललाय? असा विचार मनामध्ये येतो. यामध्ये एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले जातात. कारण जरांगे पाटील यांचं नेतृत्व संपवून टाकायचं. त्यांनी पैसे स्वीकारुन आंदोलन संपवलं असं दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूला करायचा, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी जो करार केला होता त्यात त्यांनी हे सर्व घडवून आणलं, म्हणून त्यांची बदनामी करायची, त्यांचं नेतृत्व संपवायचं, फार कुटील आणि दृष्ट डाव आहे", अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
"त्या क्लिपमधले कलाकार कोण आहेत, ते आपण पाहिलं आहे. शेवटी प्रत्येकाला स्वाभिमान असतो, एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान, खासदार श्रीकांत शिंदे यांचा स्वाभिमान किती आहे हे महाराष्ट्राला कळेल. ते टेपचं फॉरेन्सिक ॲनालिसिस करता येतं", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"कुणाचे त्यामध्ये आवाज आहेत, ते आवाज खरोखरच कॉन्फरन्स फोनचे आवाज आहेत किंवा कुणी घडवून आणलं आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. त्यामध्ये कोण माणसं आहेत ते आपल्याला कळेल. आपल्याकडे तेवढं टेक्निकल स्किल आहे. कुणी कुणाला संपवायचा डाव, कुणी कुणाला बदनाम करायचा डाव केलेला आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला पाहिजे", अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
जरांगे आणि शिंदेंचं नेतृत्व संपवण्याचा डाव, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा