अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आजीच्या निधनाची बातमी दिपकेंना पोलिसांनी सांगितली, मूळ गावाकडे रवाना झाले आई-वडील

by Team Satara Today | published on : 10 October 2026


दिल्ली : एकीकडे दिल्लीत मोठे आंदोलन सुरू असताना, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके यांचे निधन झाले.

अभिजीत दिपके CJPच्या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल होताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जंतर मंतरवर जाऊ न देता दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. याचदरम्यान ANI ने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, अभिजीत दिपके याला त्याच्या आजीच्या निधनाची बातमी सांगण्यात आली आहे. तसेच, आजीच्या अंत्यसंस्काराला जायचे की दिल्लीतच थांबायचे याचा निर्णय सर्वस्वी अभिजीतवर सोडण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी शनिवारी सकाळी ११:३० वाजता दीर्घ आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर हिंगोलीतील रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता संतुक पिंपरी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एका बाजूला कुटुंबावर शोककळा पसरली असताना, दुसरीकडे अभिजीत दिपके हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे ते अंत्यसंस्कारासाठी हजर राहू शकतील का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आजीच्या निधनाबाबत अभिजीत दिपके यांना कळवण्यात आले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. तसेच, आजीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचे की नाही याचा निर्णय दिपकेंनी घ्यायचा आहे, असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले.
मूळ गावाकडे रवाना झाले आई-वडील
अभिजीत यांच्या आजीच्या निधनाची माहिती समजताच त्यांचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता त्वरित हिंगोलीमधील गावाकडे रवाना झाले आहेत. कुटुंबावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगात आणि एका बाजूला पोलीस कारवाई व कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना, अभिजीत दिपके आपल्या आजीच्या अंतिम दर्शनासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रात परतणार का, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपके यांच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, अभिजित दीपके यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला त्यांच्याशी संपर्क साधता आला नव्हता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असून ते संतुक पिंपरी गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दीपके यांनी १५ ऑगस्ट रोजी हिंगोलीतून 'स्कूल ठीक करो' मोहीम सुरू केली होती, तेव्हा त्यांची आजीशी भेट झाली होती. त्यानंतर एका भेटीव्यतिरिक्त गेल्या २० ते २५ दिवसांत त्यांची आजीशी भेट होऊ शकली नव्हती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिल्ली पोलीस जिथे पकडतील, तेच तुमचं जंतरमंतर; कॉक्रोच जनता पार्टीचा नवा नेता अजिंक्य शिंदे याचे आवाहन
पुढील बातमी
आता प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा; सर्वसामान्यांच्या व्यथा या सरकारला कळत नाहीत

संबंधित बातम्या