भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगाने देशद्रोह केला; तुम्हाला सोडणार नाही, राहुल गांधींची निवडणूक आयोगावर सडकून टीका

by Team Satara Today | published on : 23 September 2026


दिल्ली : निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. मतदान प्रक्रियेत अनियमितता आणि मतदार यादीतील बदलांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ‘वोट चोरी’ हा भारतीय जनतेविरोधातील अपराध असून, तो संविधानावर थेट हल्ला असल्याचा दावा केला. तसेच भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने मिळून हे केल्याचा आरोप करत त्यांनी याला ‘देशद्रोह’ म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले, “मतदान चोरी हा भारतीय जनतेविरोधातील अपराध आहे आणि आपल्या संविधानावर थेट हल्ला आहे. भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने हे घडवून आणले असून, त्यांनी देशद्रोह केला आहे. न्याय होईल.” या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांना इशारा देताना, “तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे. हा देशद्रोह आहे. वेळ येईल, आम्ही तुम्हाला पकडू. तुम्ही वाचणार नाही,” असे म्हटले आहे.
काँग्रेसकडूनही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
या प्रकरणावर काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाही कमकुवत करण्याचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांत तब्बल 14 वेळा तक्रारी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांना काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली जात नव्हती. तसेच काही निर्णय घेताना त्यांच्याशी सल्लामसलत केली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या तक्रारींमध्ये SIR, फॉर्म 6 मधील बदल, नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे किंवा  समाविष्ट करणे, मतदारांची नावे पुन्हा अॅड करण्याच्या आदेशांविरोधातील अपील आणि मतदार यादीच्या सुरक्षेसह आयोगाच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
‘ज्ञानेश कुमारच सर्व निर्णय घेत आहेत’, काँग्रेसचा आरोप
काँग्रेसने आरोप केला की, तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगात सध्या केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच निर्णय घेत आहेत. ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी राहुल गांधी यांनी केलेले मतदानातील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के; धक्क्यांची तीव्रता २.१ ते २.५ इतकी नोंदली गेली
पुढील बातमी
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ट्रम्प यांचा पुनरुच्चार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक

संबंधित बातम्या