रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीने निवडणुकीत मिळवले बंपर बहुमत

by Team Satara Today | published on : 21 September 2026


दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीने निवडणुकीत बंपर बहुमत मिळवले आहे. पुतीन यांच्या पक्षाला संसदेच्या ४५० जागांपैकी ३५५ जागा मिळाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, ९५% पेक्षा जास्त मतदान केंद्रांवरील निकालांनुसार युनायटेड रशिया पक्षाला २२५ जागांवर ५८% पेक्षा कमी मत मिळाले. उर्वरित २२५ खासदार एकेरी मतदानाच्या लढतीतून निवडले गेले. ज्यापैकी २०८ जागांवर युनायटेड रशियाचे उमेदवार आघाडीवर होते. सुरुवातीच्या अंदाजानुसार युनायटेड रशिया ४५० पैकी ३५५ जागा जिंकतील, जो पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे असं सेंट्रल इलेक्शन कमिशनच्या चेअरपर्सन एला पमफिलोवा यांनी म्हटलं.
फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनसोबत सुरू झालेल्या संघर्षानंतर ही पहिलीच संसदीय निवडणूक होती. पुतीन यांनी या निवडणुकीला युक्रेन युद्धात मृत पावलेल्या सैनिकांच्या समर्थनार्थ मते मागितली होती. २०२१ साली मागील संसदीय निवडणुकीत युनायटेड रशियाने ४५० पैकी ३२४ जागांवर कब्जा केला होता. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे याब्लोको यांना यंदा निवडणूक लढण्यावर बंदी आणली होती. पण अनेक पक्षनेत्यांना काही जागांवर निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली. कथित सरकारविरोधी नेत्यांना आणि उमेदवारांनाही निवडणूक लढवण्याची संधी नाकारण्यात आली. रशियामध्ये मॉस्कोमध्ये ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली.
दरम्यान, व्लादिमीर पुतिन हे युनायटेड रशिया पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांनी २००८ ते २०१२ या काळात पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तेव्हाही ते पक्षाचे औपचारिक सदस्य नव्हते. पक्षाच्या नियमांनुसार अध्यक्षपदासाठी सदस्यत्व अनिवार्य नाही. २०१२ मध्ये पुतीन यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर दिमित्री मेदवेदेव यांनी पदभार स्वीकारला. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पार पडल्या. रशियाच्या संसदीय निवडणुकांच्या अंतिम दिवशी रविवारी युक्रेनने मॉस्को आणि आसपासच्या परिसरावर १,६०० हून अधिक ड्रोन पाठवले होते. राजधानीला लक्ष्य करून ४५० ड्रोन डागण्यात आले होते असा दावा मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला’ : भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे रंगली सुरेल मैफल
पुढील बातमी
पोलिस कर्मचाऱ्याला टेम्पोसह फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक; म्हसवड पोलिसांची कारवाई, जखमी पोलिस कर्मचारी महावीर कोकरे यांच्यावर उपचार सुरू

संबंधित बातम्या