NEET-UG परीक्षा आता कम्प्युटर-बेस्ड स्वरूपात घेण्याची तयारी सुरू; NTA प्रमुख अभिषेक सिंग यांची माहिती, परीक्षेचे आधुनिकीकरण आणि कडक सुरक्षा यांचा मेळ घालणार

by Team Satara Today | published on : 15 September 2026


दिल्ली : NEET-UG परीक्षा आता कम्प्युटर-बेस्ड स्वरूपात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील समिती या योजनेवर काम करत आहे. या निर्णयामुळे परीक्षेचे आधुनिकीकरण आणि कडक सुरक्षा यांचा मेळ घातला जाईल. तसेच, गैरप्रकार शोधण्यासाठी संस्था AI टूल्सचाही अभ्यास करत आहे, अशी माहिती NTA प्रमुख अभिषेक सिंग यांनी दिली.
NEET-UG परीक्षा आता पारंपरिक पेन आणि पेपर स्वरूपातून संगणक-आधारित चाचणीकडे वळण्यासाठी सज्ज आहे, असे NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी सांगितले. हा बदल NTA च्या परीक्षांचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि गैरप्रकार व इतर अनियमितता रोखण्यासाठी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग आहे.
इतर परीक्षाही कॉम्प्युटर बेस्ड टेस्टने
सध्या NEET-UG ही NTA कडून घेतली जाणारी एकमेव मोठी परीक्षा आहे, जी संगणक-आधारित स्वरूपात घेतली जात नाही. JEE, UGC-NET, CUET आणि NIFT या परीक्षा यापूर्वीच CBT (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) मोडवर करण्यात आल्या आहेत.
"CBT हेच भविष्य आहे, त्यामुळे आगामी काळात आमच्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने असतील," असे सिंग यांनी ANI ला सांगितले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर NEET परीक्षा ऑनलाइन घेण्यापूर्वी, NTA ला परीक्षण पायाभूत सुविधा (टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर) वाढवणे आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असेल.
इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चाधिकार टास्क फोर्स या प्रस्तावित बदलांवर काम करत आहे. संगणकाद्वारे NEET परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, सुरक्षेच्या गरजा आणि प्रणालींचे मूल्यांकन करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
NEET परीक्षेच्या प्रचंड व्याप्तीमुळे हा बदल केवळ परीक्षा पद्धतीतील सामान्य बदलांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा बनतो. कारण यासाठी संस्थेला देशभरात पुरेशी परीक्षा केंद्रे, विश्वासार्ह प्रणाली आणि कडक सुरक्षा व्यवस्था एनटीएला सुनिश्चित करावी लागणार आहे.
गैरप्रकार शोधण्यासाठी AI चा वापर
याव्यतिरिक्त, परीक्षेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि अनियमितता शोधण्यासाठी NTA आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वापराची चाचपणी करत आहे. संभाव्य फसवणूक किंवा प्रणाली-स्तरावरील समस्या ओळखण्यासाठी परीक्षा लॉग, डेटा आणि इतर पॅटर्नचे विश्लेषण करण्यासाठी AI चा वापर कसा करता येईल, याचा अभ्यास संस्था करत आहे.
सुरुवातीलाच अडचणी ओळखून परीक्षांमध्ये चुका किंवा गैरप्रकारांना कमीत कमी वाव राहील याची खात्री करणे, हा यामागील उद्देश आहे. दीर्घकालीन विचार करता, आंतरराष्ट्रीय ठिकाणीही परीक्षा घेण्याबाबत एनटीए विचार करत आहे. सिंग यांच्या मते, भारतातील परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणे हे NTA चे तात्काळ प्राधान्य आहे.
एकदा ही प्रणाली भक्कम झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि जागतिक संस्थांसाठी परीक्षा घेण्याच्या शक्यतेचा शोध घेण्याची संस्थेचा विचार आहे. पेपर फुटी, तोतयागिरी आणि इतर प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रणाली मजबूत करण्यावर जास्त भर दिला जात असताना, आणि परीक्षेच्या सुरक्षेबाबत NTA वर नव्याने बारकाईने लक्ष ठेवले जात असताना या बदलांची माहिती समोर आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळांबाबतची मोहिम गुजरातमध्येह राबवण्यात येणार; अभिजीत दीपके यांची नवी रणनीती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुढील बातमी
UCC च्या घोषणेवरून औवेसींचे अमित शाहांना आव्हान, म्हणाले – 'तुमच्यात हिंमत असेल तर गोव्यात UCC लागू करून दाखवा...'

संबंधित बातम्या