दिल्ली : 'कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याच्या वडिलांवर हल्ला करणारा स्वतंत्र भारद्वाज याला दिल्लीपोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले आहे. भारद्वाज याच्या अटकेच्या मागणीसाठी सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यानंतर, पोलिसांनी स्वतंत्र याला ७२ तासांच्या आत अटक करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी बुलंदशहरमधील चोला पोलीस ठाण्यात नेले असून, तिथे त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. स्वतंत्र भारद्वाज याची एक मुलाखत व्हायरल झाल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी'ने पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याला घेराव घातला. व्हायरल झालेल्या मुलाखतीत भारद्वाज याने जुलै महिन्यात जंतर मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आंदोलक निशू आझाद यांचे वडील संजय कुमार यांना गंभीर जखमी केले होते, असा दावा केला आहे. तसेच, आपल्या राजकीय प्रभावामुळे आपल्यावर कारवाई झाली नसल्याचे म्हटले.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे सीजेपी समर्थक आणि दलित कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी शुक्रवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याला घेराव घातला. भारद्वाज याच्यावर कठोर कारवाई न केल्याचा आरोप करत आंदोलकांनी दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांमध्ये सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका, तसेच आझाद समाज पार्टीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांचा समावेश होता. भारद्वाज याची ही मुलाखत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. यानंतर हे आंदोलन सुरू झाले.
'सीजेपी'च्या निदर्शनानंतर दिल्ली पोलिस ॲक्शन मोडमध्ये; उत्तर प्रदेशातून स्वतंत्र भारद्वाज याला घेतले ताब्यात
by Team Satara Today | published on : 04 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा