दिल्ली : नेपाळमधील तिबेट सीमेजवळ असलेल्या रसुवा जिल्ह्यात आज (दि. २६) भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून १०५ भारतीय पर्यटक आणि ३७ अनिवासी भारतीय (NRI) यांच्यासह जवळपास ३८४ नागरिक बेपत्ता आहेत. पुराच्या तीव्र लाटेमुळे रस्ते, पूल आणि व्यापारी पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमारास रसुवागढी-तिमुरी भागात भोटे कोशी नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली. या पुराचा फटका रसुवासह शेजारील नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांनाही बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या ३८४ जणांमध्ये २९१ परदेशी आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ही यादी प्राथमिक असून ट्रॅव्हल एजन्सी आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने माहितीची पडताळणी सुरू आहे.
अचानक आलेल्या पुराचे कारण काय?
भोटे कोसी नदीच्या पाणी पातळीत अचानक झालेल्या वाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, रसुवा भागात झालेल्या पावसामुळे हा पूर आलेला नाही. सीमावर्ती तिबेटच्या बाजूला हिमनदीच्या सरोवराचा बांध फुटणे, दरड कोसळणे किंवा अन्य एखाद्या घटनेमुळे हे घडले असावे का, याची तपासणी अधिकारी करत आहेत.
नेपाळमधील त्रिशुली नदीला आलेल्या पुराचे पाणी खालील भागात वाहून येत असल्याने भारतातील गंडक नदीच्या काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा करून एनडीआरएफ (NDRF) तुकड्या तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांतील प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
कैलास मानसरोवर यात्रेकरू संपर्काबाहेर
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये तिबेटच्या दिशेने कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या मोठ्या संख्येतील भाविकांचा समावेश आहे. काठमांडूतील ट्रॅव्हल एजन्सीनुसार, बुधवारी सीमा ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या ३९० यात्रेकरूंपैकी बहुतांश भाविकांशी दुपारनंतर संपर्क होऊ शकलेला नाही.
सैन्य आणि हेलिकॉप्टरद्वारे युद्धपातळीवर बचावकार्य
नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तात्काळ शोध व बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी १४ हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स आणि स्निफर डॉग्सची मदत घेतली जात आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या २६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही शोध सुरू आहे. लष्कराने जखमींवर उपचारासाठी त्रिशुली येथे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू केले आहे.
भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "या संकटसमयी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताकडून सर्व प्रकारची मानवतावादी मदत आणि बचावकार्यात सहकार्य केले जाईल," असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.