BA, BSc, B.Com पदव्या नोकरी देण्यास सक्षम नाहीत?; नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, शिक्षण प्रणालीला अधिक नोकरी-केंद्रित बनवण्याची शिफारस

by Team Satara Today | published on : 26 August 2026


नवी दिल्ली - देशात BA, Bsc, Bcom या सारख्या पदव्या दीर्घकाळापासून उच्च शिक्षणाचा महत्त्वाचा भाग राहिल्या आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या पदव्या मिळवण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतात. परंतु नीती आयोगाच्या रिपोर्टमधून या पदव्या आणि नोकऱ्या यांच्यातील एक महत्त्वाचा संबंध समोर आला आहे. सध्या या पदव्या मिळवल्यानंतर नोकरी मिळवणे अवघड झाले आहे.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अनेक विद्यार्थी नोकरीच्या संधी कमी असलेल्या सामान्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत आहेत. शिक्षण प्रणालीला अधिक नोकरी-केंद्रित बनवण्यासाठी आयोगाने त्यात बदल करण्याची शिफारस केली आहे. नीती आयोगाने अलीकडेच “विकसित भारत २०४७ साठी कौशल्य विकासावर भर” नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये देशाची उच्च आणि तांत्रिक शिक्षण प्रणाली, लेबर मार्केटच्या बदलत्या गरजा यांच्यातील तफावतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बहुतेक शैक्षणिक संस्थेकडे कालबाह्य अभ्यासक्रम आहेत, जे बदलत्या उद्योग गरजांशी जुळवून घेत नाहीत. परिणामी डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट नेहमीच नोकरीसाठी पात्रतेत ठरत नाहीत. आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ च्या रिपोर्टनुसार केवळ ८.२५ टक्के पदवीधर त्यांच्या पात्रतेनुसार योग्य पदांवर कार्यरत आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी बीए, बीएससी आणि बीकॉम सारख्या पदव्या घेतात परंतु पदवी मिळवल्यानंतरही अनेक तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांची कमतरता असते. याचा परिणाम त्यांच्या रोजगाराच्या संधींवर होतो. अनेकांना नोकरी शोधण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो. तर काहींना त्यांच्या पात्रता आणि शिक्षणाच्या तुलनेत कमी पगार असलेल्या नोकऱ्या करण्यास भाग पडते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

सरकारी नोकरीसाठी घेतात पदव्या

बहुतांश विद्यार्थी या पदव्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घेतात. पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ३.४ कोटी विद्यार्थ्यांपैकी १.१३ कोटी विद्यार्थी केवळ बीए अभ्यासक्रमांमध्ये आहेत. बीए, बीएससी आणि बीकॉम अभ्यासक्रमांमध्ये एकूण २ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. NITI आयोगाने उच्च शिक्षणाला रोजगाराशी जोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी अनेक सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनी पारंपारिक अभ्यासाबरोबरच व्यावहारिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

'या' ५ गोष्टींकडे वेधले लक्ष

अभ्यासक्रमातील बदल - विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यमान अभ्यासक्रमात सुधारणा करावी

नवीन कौशल्यांचा समावेश - कोडिंग, डेटा विश्लेषण, डिजिटल मार्केटिंग आणि इतर कौशल्ये अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाऊ शकतात.

इंटर्नशिपवर लक्ष केंद्रित करणे - विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिपच्या संधी वाढवल्या पाहिजेत.

उद्योग संबंध - विद्यार्थ्यांना बदलणारे तंत्रज्ञान आणि कार्यप्रक्रिया यांची अधिक चांगली समज मिळावी यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी कंपन्या व उद्योगांसोबतचे सहकार्य वाढवावे.

स्किल बेस्ड कोर्स - व्यावसायिक आणि रोजगाराशी संबंधित कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधीचे फडणवीस यांना पत्र; आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐका
पुढील बातमी
BA, BSc, B.Com पदव्या नोकरी देण्यास सक्षम नाहीत?; नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, शिक्षण प्रणालीला अधिक नोकरी-केंद्रित बनवण्याची शिफारस

संबंधित बातम्या