सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत मुदत

by Team Satara Today | published on : 12 November 2026


सातारा  : सैनिक स्कूल सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक पालकांना २ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.
​नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेसाठी ३ नोव्हेंबर २०२६ पासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. या प्रवेशासाठी प्रशासनाकडून वयोमर्यादेची अट निश्चित करण्यात आली असून, इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असावे. पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाइन प्रवेश अर्ज २ डिसेंबर २०२६ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत विहित मुदतीत भरणे अनिवार्य राहणार आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंका व अडचणींच्या निवारणासाठी पालकांनी https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तांत्रिक अडचणी आणि शेवटच्या क्षणाची होणारी गर्दी टाळण्यासाठी पालकांनी लवकरात लवकर अर्ज भरून या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक स्कूल सातारा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील ५९ गावे आणि ३२२ वाड्यांची तहान ५२ टँकरवर; माण तालुक्यात सर्वाधिक झळ

संबंधित बातम्या