सातारच्या ऐतिहासिक भूमीत साहित्यिक विचार संस्कृतीची चळवळ व्यापक करणारे साहित्यिक रत्न डॉ यशवंत पाटणे यांचे साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत कोल्हापूर येथील डॉ. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ यांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) पदवीने रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सन्मानित करण्यात येत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्याचा ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग काटेकर सातारा यांनी घेतलेला आढावा....
शब्दरूपी साहित्यिक विचाराचे गुंफण करून त्या शब्दरूपी साहित्यिक संस्कृतीचे तोरण बांधून सुगंधरुपी साहित्यिकाची बाग फुलवणारे डॉ यशवंत पाटणे म्हणजे ज्ञान संस्कृती व साहित्यिक संस्कृतीचे चालते बोलते विद्यापीठच म्हणावे लागेल. डॉ यशवंत पाटणे हे ज्ञान क्षेत्रातील डॉक्टरकी बरोबरच आता साहित्यिक क्षेत्रातील डॉक्टरकीचाही त्यांना बहुमान प्राप्त झाला आहे. सातारकरांसाठी हा अभिमानास्पद बाब आहे. सातारच्या साहित्यिक संस्कृतीला नवा आयाम देण्यामध्ये डॉ यशवंत पाटणे यांचे आजपर्यंत बहुमूल्य योगदान राहिले आहे. त्यांना प्राप्त झालेला साहित्यिक क्षेत्रातील डॉक्टरकी मुळे सातारच्या साहित्यिक क्षेत्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. ज्ञानसागरातील शिल्पातून जसे मोती निर्माण होतात तसेच सातारच्या साहित्यिक विचार संस्कृतीतून डॉ यशवंत पाटणे यांच्या शब्दसागरातून साहित्यिक विचारांची निर्मिती घडते हा इतिहास आहे. सातारा जिल्हा हा जसा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसाच तो साहित्यिक रत्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत विचाराचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक वारसा व परंपरा लाभलेल्या या जिल्ह्यात असंख्य साहित्यिक रत्न,लेखक,कवी निर्माण झाले. अशा असंख्य साहित्यिकांनी सातारच्या भूमीचे नाव साता समुद्र पलीकडे पोचवले यामध्ये कवी बा. सी. मर्ढेकर, कवी वि.वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज,कवी वसंत बापट,साहित्यिक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे, चित्रपट कथा लेखक प्रताप गंगावणे, डॉ. राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, प्रा. संभाजीराव पाटणे यांनी साहित्यिक चळवळ गतिमान करण्यामध्ये मोठे योगदान दिले. हीच परंपरा आणि हाच वारसा पुढे अखंडपणे डॉ यशवंत पाटणे पुढे घेऊन जात आहेत. अर्थात सातारच्या साहित्यिक परंपरेला साजेशी अशी कामगिरी करण्यामध्ये सहकार रत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे तितकेच महत्त्वपूर्ण योगदान आहे.
सातारा जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ ही व्यापक व्हावी व साहित्यिक क्षेत्रातील लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांनी सातारच्या भूमीत पहिल्यांदा अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवून साहित्यिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली हे संमेलन दिमाखदार पणे संपन्न झाले. या संमेलनातून अनेक साहित्यिक विचारधारेला बळ मिळाले. यामधून अनेक साहित्यिकांनी प्रेरणा घेऊन साहित्यिक क्षेत्रासाठी अनमोल साहित्यिक निर्मिती निर्माण केली. साहित्यिकांच्या व्यथा व वेदना यांना यानिमित्ताने एक व्यासपीठ स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी खुले करून दिले. तोच वारसा व परंपरा पुढे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले घेऊन जात आहे. त्यांनीही सातारच्या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ व्यापक करण्यासाठी पुढाकार घेत सातारच्या भूमीत अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वीपणे करून दाखवले. अर्थात या संमेलनासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे तितकेच महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
एकंदरीतच साहित्यिक सांस्कृतिक विचारधारेला बळ देणाऱ्या या सर्वांच्या सहकार्यातून सातारच्या भूमीत साहित्यिक विचाराचे लावलेले रोपटे आता डॉ यशवंत पाटणे यांच्या रूपात आता वटवृक्षात रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे. डॉ यशवंत पाटणे यांनी सातारच्या साहित्यिक विचारधारेला अधिक प्रगल्भ व समृद्ध करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये ग्रंथालय चळवळ. ग्रंथ प्रदर्शन. साहित्यिक संमेलन. यांना त्यांनी नेहमीच बळ दिले आहे. बेळगाव येथे होणाऱ्या साहित्यिक संमेलनाचे ते अध्यक्षपदी भूषवणार आहेत हे आपल्या सातारकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. डॉ यशवंत पाटणे हे जसे साहित्यिक आहेत तसे उत्तम वक्ते ही आहेत. श्रोत्यांना मधुर वाणीने खेळवून ठेवण्याचे त्यांच्याकडे साहित्यिक रुपी सामर्थ्य ही आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा डॉक्टर ऑफ लिटरेचर या पुरस्काराने सन्मान होत आहे हा खरं सातारच्या भूमितील साहित्यिक विचारांचा व संस्काराचा बहुमान आहे.
डॉ. यशवंत पाटणे : साहित्यिक संस्कृतीचे दीपस्तंभ
- श्रीरंग काटेकर (सातारा)
by Team Satara Today | published on : 22 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा