सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील किंबहुना देशातील सहकारी बँका अवसायनात निघाल्या, काही तर देशोधडीला लागल्या; परंतु सातारा जिल्हा बँकेने आपले सत्त्व जपले. चांगल्या लोकांच्या हातात बँक असल्याने सातारा डीसीसी अद्यापतरी सुस्थितीत आहे. मात्र, यंदा काही झाले तरी डीसीसीवर चढाई करायची, असा निर्धार भाजपने केल्यामुळे जिल्ह्यात अभूतपूर्व अशा अभद्र युत्या आणि दोस्त्या जिल्हावासीयांना पाहायला मिळत आहेत. काल कराड येथे झालेल्या प्रचार दौऱ्यात अशीच एक अभद्र युती पाहायला मिळाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने १५ ऑगस्ट १९४९ रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण, दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई, देशभक्त किसनवीर आबा, रघुनाथराव पाटील, महान स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे गुरुजी यांनी सर्वांनी मिळून २ लाख रुपयांच्या प्राथमिक भागभांडवलावर या बँकेची स्थापना केली होती. यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळालेच होते. यानंतरच्या काळातही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील लाखो लोकांची मुख्य अर्थवाहिनी समजली जात होती.
अलीकडच्या काळामध्ये राज्यातील अनेक सहकारी बँका अवसायनात निघत असताना सातारा डीसीसीला मात्र सलग सातवेळा नाबार्डचा उत्कृष्ट बँकिंगचा पुरस्कार मिळाला होता. अर्थात ही किमया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यामुळेच शक्य झाली होती. नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीजनांची या बँकेला नजर लागली व बँकेच्या सत्ताकारणातून विलासकाका बाजूला झाले. असे असले तरी आजपर्यंत ही बँक शाबूत आहे, हेही नसे थोडके.
२०१४ साली राज्यात आणि देशात अभूतपूर्व असे सत्तांतर झाले. एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा अलीकडच्या काळामध्ये भाजपमय झाला आहे. अर्थात जुन्याच बाटलीत नवीन दारू, असाच काहीसा प्रकार आहे. सातारा डीसीसी बँकेला आता उणीपुरी ७६ वर्षे होत आहेत. डीसीसी बँकेवर यापूर्वी जरी राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला असला तरी त्यांनी या बँकेला ऊर्जितावस्था मिळवून दिली. मात्र, या बँकेला आता भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची नजर लागली आहे. या बँकेमधील ठेवींवर भाजपेयींच्या उद्योगपती मित्रांची नक्कीच नजर असणार आहे. कारण एकेकाळी सोन्याने मढवलेली मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक कोणी देशोधडीला लावली, हे सहकारातील नवखाही सांगू शकतो. येणाऱ्या काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुंबै बँकेसारखी अवस्था होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
असो, येत्या १ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ पैकी १२ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे. याअगोदरच ९ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत १२ जागा निवडून आणण्याचा चंगच भाजप आणि मित्रपक्षांनी बांधलेला आहे. या अनुषंगाने काल दि. २८ रोजी कराड येथे महायुतीची प्रचारसभा झाली. या सभेला सार्व. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री जयकुमार गोरेही व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष म्हणजे सध्या नेमक्या कोणत्या पक्षात (?) कार्यरत असणारे विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकरही या मेळाव्याला उपस्थित होते. नेमकी व्यासपीठावर आसनव्यवस्थाही विचित्र पद्धतीने करण्यात आली होती. जयकुमार गोरे आणि मिस्टर रामराजे एकमेकांच्या बाजूला बसलेला क्षण अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि उपस्थितांनी जयकुमार गोरे आणि रामराजे एकमेकांशी संवाद साधत असल्याचे पाहून आपल्या भुवया उंचावून घेतल्या. कित्येकांनी स्वतःच्या हातावर चिमटा काढत हे दृश्य खरे आहे काय, याबाबतची खात्री केली.
राजकारणामध्ये निकोप स्पर्धा असायला हवी, हे अगदी जिल्हावासीयांनी स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, मालोजीराजे, कृष्णचंद्र भोईटे, किसनवीर आबा, चिमणराव कदम, प्रतापराव भोसले, शंकरराव जगताप यांच्यापर्यंत जिल्ह्याने बघितलेले आहे. मात्र १९९५ ला आगळीक झाली. सरंजामी विचार डोक्यात भिनलेले सत्तेत आले आणि राजकारणात असलेली निकोप स्पर्धा जीवघेणी झाली. अर्थात साताऱ्याचे राजकारण नासवण्याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त मिस्टर रामराजेंना द्यायला हवे. त्याला कारणही तसेच आहे.
फलटण तालुक्याचे माजी आमदार तथा शरद पवारांचे वैचारिक विरोधक चिमणराव कदम यांचे राजकारण संपवण्यासाठी शरद पवारांनी मिस्टर रामराजेंना रसद पुरवली. मात्र, रामराजेंनी आपला स्वार्थ साधत फलटण तालुका बकाल करून टाकला. जो-जो विरोधक असेल त्याला निर्घृणपणे राजकारणातून संपवण्यात आले. त्याला स्वपक्षीय माजी मंत्री शशिकांत शिंदेजीही अपवाद नव्हते.
साताऱ्यातील सर्किट हाऊसमध्ये बसून तत्कालीन पालकमंत्री असणाऱ्या रामराजेंनी अनेकांना घोडे लावले. घोड्याची ताकद पुरेना म्हणून अगदी महाबळेश्वरमधून गवेही पाचारण केले. हा झाला गमतीचा भाग; परंतु रामराजेंचे जिल्ह्याचे राजकारण पहिल्यापासूनच अवसानघातकी राहिले आहे. ज्या शरद पवारांनी सबंध महाराष्ट्रातील इतर नेत्यांपेक्षा मिस्टर रामराजेंवर सर्वाधिक प्रेम केले, सर्वाधिक ताकद दिली, त्याच रामराजेंनी राष्ट्रवादीची शकले झाल्यानंतर राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांचा हात झटकला. भविष्यामध्ये ‘एहसान फरामोश’ कसा असावा, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मिस्टर रामराजेंचे उदाहरण दिल्यास वावगे ठरणार नाही.
असो, तर मूळ मुद्द्यावर वळूयात. काल झालेल्या मेळाव्यामध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या मिस्टर रामराजे व गोरे यांच्यात व्यासपीठावरच गुफ्तगू झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. यानंतर एकमेकांचे हात उंचावून विजयी मुद्राही देण्यात आली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयकुमार गोरे नावाची ब्याद नको, असा उच्चार रामराजे २००९ पासून करीत आहेत. २००९ साली जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे तत्कालीन पराभूत उमेदवार सदाशिवतात्या पोळ यांच्या घरासमोरच मोठा राडा झाला होता. बंदोबस्तावर असलेल्या एका शिपायाला बेदम मारहाण करून त्याची सरकारी बंदूकही तोडण्यात आली होती. हे प्रकरण राज्यभरामध्ये चांगलेच गाजले होते. त्यालाही रामराजेंकडून जातीय रंग देण्याचे प्रयत्न केले गेले होते. २००९-२४ सलग चौथी टर्म जयकुमार गोरे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आतातर त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे. पण ज्यावेळी जयकुमार गोरे सत्तेत नव्हते, त्यावेळेस त्यांना अडचणीत आणून जेलमध्ये टाकण्याचे काम कोणी केले, हे जिल्ह्यातील शेंबडे पोरगेही सांगू शकते.
त्यावेळी रामराजे सुपात होते, तर गोरे जात्यात होते. आता नेमकी उलट परिस्थिती आहे. एकवेळ चाकूने मारलेल्या जखमा बऱ्या होतात; परंतु केलेले शाब्दिक वार मात्र तसेच भळभळत राहतात. गेली तीन दशकांचे रामराजेंचे राजकारण संपल्यात जमा आहे. न घर का, ना घाट का, अशी अवस्था मिस्टर रामराजेंची झालेली आहे. येऊ नको, तर कोणत्या गाडीत बसू? अशी परिस्थिती जिल्हा बँकेच्या निमित्ताने त्यांची झालेली आहे.
फलटण येथील बरडच्या साडेचारशे एकर माळरानावर नंदनवन फुलवू पाहणाऱ्या डॉ. तासगांवकरांचा मेंदू फलटणच्या रस्त्यावर इस्तत पाडू, अशी धमकी त्यांना देणाऱ्या रामराजेंची अवस्था रामराजेंचा ‘तो’ रुतबा पाहणाऱ्या अनेकांना पाहावीशी वाटत नाही. शेवटी जयकुमार गोरे प्रगल्भ आहेत. ज्या माणसाने पराकोटीचा त्रास दिला, अशांचा सन्मान करून झालेल्या राजकीय जखमाही बऱ्या होऊ शकतात, असा संकेत यानिमित्ताने दिला असला तरी ही दिलजमाई निरंतर, की औट घटकेची ठरणार, हे मात्र येणारा काळच सांगू शकतो. शेवटी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने ही अभद्र युती चिरायु होवो!
- संग्राम निकाळजे
अभद्र युती चिरायु होवो !
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा