पवार साहेब-सुप्रियाताई लग्न सरबराईतून मोकळे झालात?

तर, थोडी बिनीच्या दिवंगत कार्यकर्त्यालाही श्रद्धांजली वाहा...

by Team Satara Today | published on : 12 August 2026


ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांची नात रेवती सुळे यांचे नुकतंच लग्न झालं. या लग्नाचे रिसेप्शन दिल्ली येथे पार पडले. या स्वागत सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी व विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनीही हजेरी लावली होती. राजकीय भाईचारा कसा जपावा, हे प्रत्येकाने शरद पवार यांच्याकडून शिकले पाहिजे. गेली बारा वर्षे शरद पवार केंद्रातील सत्तेतून बाहेर असले तरी त्यांनी या वयातही आपली राजकीय पॉवर अबाधित ठेवलेली आहे.

​बारामतीचे पवार कुटुंब राज्यातील किंबहुना देशातील एक पॉवरफुल कुटुंब म्हणून ओळखले जाते. शरद पवारांच्या कर्तृत्वाने या कुटुंबाला एक वेगळी राजकीय ओळख मिळाली. असे असले तरी शरद पवारांनी भाऊबंदकीचा विचार न करता एकाच अपत्यावर थांबणे पसंत केले. प्रत्येकजण आपले राजकीय वारसदार शोधत असतो. पण त्या काळामध्ये एकाच अपत्यावर म्हणजे मुलीच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा न ठेवता मुलगीही वंशाचा दिवा ठरू शकते, हे संपूर्ण देशाला शरद पवारांनी दाखवून दिले.

​ज्या काळामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते, त्या काळामध्ये ‘हम दो, हमारे दो’ ही पंचलाईन गाजत असतानाच ‘हम दो, हमारा एक’ असा आदर्श देशासमोर पवार दाम्पत्याने ठेवलेला होता. पवारांची लेक सुप्रिया सुळे यांनी २००९ साली राजकारणात येत आपण शरद पवारांची लेक असल्याचे सिद्ध करून दाखवले. आपल्या नावाभोवती पवार आडनावाचे वलय असले तरी त्यांनी आपल्या पतीचे म्हणजेच सुळे आडनाव लावणेच पसंत केले.

​रेवती ही सुप्रिया आणि सदानंद सुळे यांची कन्या. म्हणजेच शरद पवारांची ही तिसरी पिढी. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच २० जून २०२६ रोजी मुंबईत रेवती आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. पवारांच्या नातीचे लग्न असल्याने राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी या डोळे दीपवणाऱ्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी पवारांसाठी जिवाचे रान केले, आपले आयुष्य खर्ची घातले असा कार्यकर्ता या लग्नाच्या आसपासही फिरकू दिला नाही.

​खरेतर लग्न किंवा कोणताही मंगल प्रसंग हा खाजगी असतो. प्रत्येकालाच खाजगी आयुष्य असते. कोणाला बोलवावे, कोणाला नाही, हा प्रश्न ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो. परंतु पवारांचे राजकारण मुळातच ग्रामीण भागातून सुरू झाले. शेवटपर्यंत ग्रामीण महाराष्ट्राने त्यांना खऱ्या अर्थाने साथ दिली. आणि राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाली तरी अद्यापही शरद पवारांचा करिष्मा ग्रामीण भागामध्ये टिकून आहे.

​एकेकाळी राज्याला मुख्यमंत्री देणारी शिवसेना संपली (संपवली). कारण शिवसेनेचे राजकारण खरेतर शहराधिष्ठित राहिले. परंतु पवारांचा वावर कॉर्पोरेट, उद्योग क्षेत्रामध्ये असला तरी त्यांनी आपली ग्रामीण भागाबरोबर असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. त्याचीच फलश्रुती म्हणून पक्ष फुटला तरी शरद पवारांचे राजकीय स्थान अबाधित आहे.

​पूर्वी राजकीय पुढाऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांची लग्ने व्हायची. संपूर्ण मतदारसंघांमधील पंचक्रोशीला महिनाभर पंगत असायची. कारण की, राजकीय पुढारी आणि मतदारसंघांमधील जनतेमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या लग्नामध्ये त्यांचे वडील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटलांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा जेवू घातला होता. तसेच विहिरीत केलेल्या सरबताचीही आठवण अनेक ज्येष्ठ लोक मोठ्या चवीने सांगतात. पण काळानुरूप हे नाते बदलत गेले. आता तर ते पूर्णतः औपचारिक झालेले आहे. पवारांचे राजकारण हे खरेतर सातारा जिल्ह्यापासून सुरू झाले. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरू, असे ते म्हणतात. यशवंतराव चव्हाणांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली.

​काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारसेही त्यांनी साताऱ्यात घातले. यावेळी सातारा जिल्ह्यातील माजी खासदार दिवंगत लक्ष्मणतात्या पाटील असोत, अभयसिंहराजे भोसले, पी. डी. पाटील, विक्रमसिंह पाटणकर अशा तत्कालीन काँग्रेसजनांनी पवारांना साथ दिली. ही जरी कद्दावर नावे असली तरी सातारा जिल्ह्यातील अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी पवारांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. यापैकी काहींना मी जवळून बघितले. त्यांच्याशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले. ते म्हणजे, फलटण तालुक्यातील सुभाष शिंदे आणि दुसरे म्हणजे गेल्या महिन्यात म्हणजेच २० जुलै रोजी ज्यांचे निधन झाले, ते नंदकुमार संभाजी मोरे. ही गुरू-शिष्याची जोडी किमान मी तीन दशकांपासून अगदी जवळून पाहत आहे. शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा ठरल्यानंतर ही जोडगोळी सातारा जिल्ह्याच्या सीमेवरच पवार साहेबांच्या गाडीत बसत. जिल्ह्यात काय चाललंय, कोण भानगडी करतंय, कोण मेखा मारतंय याची इत्यंभूत माहिती पवार साहेबांना दहा मिनिटांत कळे. शरद पवार मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड भलताच स्ट्रॉंग झालेला होता. कराड दक्षिण मतदारसंघातील विलासकाका उंडाळकर असोत, किंवा फलटण विधानसभा मतदारसंघाचे सलग तीनवेळा आमदार राहिलेले सूर्याजी उर्फ चिमणराव कदम. ही पवारांना नडणारी माणसं. जिल्ह्यात आल्यानंतर या दोघांचा काटा कसा काढायचा, हेच गणित पवारांच्या डोक्यात असे. पण हे दोघेही चिवट. आणि त्यातल्या त्यात एकमेकांचे नातेवाईक. त्यांच्या विरोधात तुल्यबळ भिडू पवारांना मिळत नव्हता.

​बारामती आणि फलटण हे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलेले तालुके. शड्डू फलटणमध्ये ठोकला तर त्याचा आवाज बारामतीला नक्कीच जाणार, अशी परिस्थिती असताना सूर्याजी उर्फ चिमणराव कदमांच्या विरोधात उंचापुरा, देखणा गडी शरद पवारांनी शोधलेला होता. त्यांचे नाव म्हणजे सुभाषराव तुकाराम शिंदे.

​फलटण तालुक्यातील शिंदेवाडीचा हा गडी पवारांच्या प्रथमपासूनच म्हणजेच पवारांनी राजकारणाची सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांच्याबरोबर राहिलेला होता. प्रतिभाताई पवार म्हणजेच शरद पवारांच्या पत्नीनंतर त्यांच्यावर अधिक प्रेम करणारे कोणी असेल, तर ते म्हणजे सुभाषराव शिंदे. पवारांनी त्यांना फलटण सहकारी दूध संघाचे चेअरमन केले. १९९० मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक चिमणराव कदमांविरोधात लढवली होती. कदमांसारख्या तगड्या उमेदवाराविरोधात शिंदेंनी निकराची झुंज दिलेली होती. त्यांना त्यावेळी घोडा हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. आजही ते चिन्ह फलटणकरांच्या चांगलेच लक्षात आहे.

​शरद पवार आणि सुभाषराव शिंदे हे समीकरण सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला माहीत होते. पवारांच्या वाढदिनी न चुकता ते त्यांचा विशेष गौरवग्रंथ प्रसिद्ध करीत असत. फलटण तालुका आणि जिल्ह्यात ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते. मात्र, १३ मार्च २०२४ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. एक उमदा पुढारी फलटण तालुक्याने गमावला. सुभाषराव, मी तुम्हाला आमदार करणार, असा शब्द शरद पवारांनी त्यांना अनेकदा दिला होता. परंतु शेवटपर्यंत शरद पवारांनी आपला शब्द पाळला नाही. लायकी नसणाऱ्यांना पवारांनी आमदार-खासदार केले. बलात्काऱ्यांना पद्मश्री दिली, पण ज्या माणसाने आपल्यासाठी आयुष्य झिजवले, त्यांना मात्र कायमच उपेक्षितच ठेवले. सुभाष शिंदेही त्यातलेच उपेक्षित.

​फलटण तालुक्यात गेली ३० वर्षे विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विचाराच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यांचीही विधान परिषदेची टर्म संपली. फलटण नगरपालिका आणि पंचायत समितीतही सत्ता गेली. म्हणजेच ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा फलटण संस्थान खालसा झाले. अशा मिस्टर रामराजेंना पवारांनी पसा-पसा भरून दिले. मात्र याच रामराजेंनी पवारांना खंबाटकीचा घाट दाखवत त्यांचा हात झटकत अजित पवारांबरोबर जाणे पसंत केले. कदाचित त्याचवेळी पवारांनी सुभाष शिंदेंना झुकते माप दिले असते तर पाठीला पाठ लागून असलेला फलटण तालुका गमावण्याची वेळ आज पवारांवर आली नसती. परंतु पवारांचे मीठच आळणी.

​सुभाष शिंदे हे मरेपर्यंत उपेक्षित राहिले, तर त्यांच्याबरोबर कायम राहणारे नंदकुमार संभाजी मोरे यांचेही गेल्या महिन्यात फलटण येथे निधन झाले. शरद पवारांवर प्रेम करणारे निस्सीम कार्यकर्ते आज या जगात नाहीत. नंदकुमार मोरे यांचे निधन झाल्यानंतर ना शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, ना सुप्रिया सुळेंनी. एअरपोर्टवर भेटलेल्या आगंतुकांची सेल्फी सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुळेंना कदाचित घरातील लगीनघाईमुळे वेळ मिळाला नसेल. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथी दिनी जकातवाडी येथे दरवर्षी न विसरता बिर्याणी आणि मटण झोडणाऱ्या शरद पवारांना नंदकुमार मोरे यांच्या निधनाचा विसर पडला. हे खरोखरच अविश्वासार्ह आहे.

​लग्न पार पडले. काल दिल्लीत स्वागत समारंभही पार पडला. यातून वेळ मिळाला तर पवार कुटुंबियांनी फलटणला येऊन मोरे कुटुंबियांचे सांत्वन करावे. अगर विसरलेच असतील तर सोशल मीडियावर दोन ओळी टाकून श्रद्धांजली तरी व्हावी, अशी अपेक्षा फलटण आणि सातारा जिल्ह्यातील अनेक सतरंज्या उचले कार्यकर्ते करीत आहेत.

​- संग्राम निकाळजे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रात्रीत हरपले आई-वडिलांचे छत्र; चौथी, दुसरीतील भावंडांसमोर भवितव्‍याचा प्रश्‍न; मलकापूरच्या घटनेने दुःखद वास्तव समोर
पुढील बातमी
मराठा आरक्षणासाठी आता निर्णायक लढा; जरांगेंचा सरकारला थेट इशारा; ५७ लाख नोंदी रद्द करणारे सरकार मोडून काढण्याचे महाराष्ट्राला आवाहन

संबंधित बातम्या