बौद्ध धम्म हा 'आकड्यांच्या' खेळात किंवा 'राजकीय' शक्तीमध्ये कदाचित प्रतिष्ठित दिसत नसेल, पण 'मानवी विवेक' आणि 'नैतिकता' म्हणून तो जगातील सर्वात प्रतिष्ठित विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, "जग जर विनाशापासून वाचवायचे असेल, तर त्याला बुद्धाच्या मार्गावर यावेच लागेल. सम्राट अशोक हा बुद्धाचे विचार जनमानसात रुजवणारा करुणाशील राजा होता. जगात जन्मास येणाऱ्या प्रत्येक पिढ्याना सम्राट अशोकाचे मानवतावादी विचार सदैव मार्गदर्शन करतील. आपण हा वारसा जपण्यासाठी काय करणार आपण एकत्र येऊन ठरवूयात.
आशिया खंडात चक्रवर्ती सम्राट अशोक हा राजा इतिहासात होऊन गेला. चंद्रगुप्त मौर्यचा मुलगा राजा बिंदुसार होता. अशोक हा मौर्य सम्राट बिंदूसार आणि सुभद्रांगी यांचा मुलगा होता. अशोकाचा जन्म इ.स.पूर्व ३०४ मध्ये झाला. त्याने मौर्य साम्राज्याला त्या काळातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक बनवले.त्याचा शासनकाळ इ.स.पूर्व २६८ते इ.स.पूर्व २३२ पर्यंत होता. अशोकाच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंत होता.. सुसीमा हा बिंदूसाराचा ज्येष्ठ पुत्र होता.बिंदूसाराची इच्छा होती की त्याचा मुलगा सुसिमा वारसदार व्हावा. अशोक शस्त्र आणि लष्करी प्रशिक्षणात पारंगत होता.
त्याला उज्जैनचा राज्यपाल बनवण्यात आले,जिथे त्याने आपले कौशल्य दाखवले.इ.स.पूर्व २७२ मध्ये बिंदूसाराच्या मृत्यूनंतर,अशोक राज्याच्या मंत्र्यांच्या पाठिंब्याने राजा झाला.अशोक इतका निर्दयी आणि क्रूर होता की त्याने कैद्यांसाठी एक छळगृह बांधले होते. अशोक यास चंडशोक म्हणजेच क्रूर अशोक म्हणून ओळखले जात असे. इसवी सन पूर्व २६१ मधील कलिंगचे युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सम्राट अशोक जिंकला पण रणांगणावरील रक्ताचा सडा आणि लोकांचे आक्रोश पाहून अशोकाचे हृदय परिवर्तन झाले.त्याचे हृदय कळवळले .विश्वविजय मिळताना युद्धातून किती विध्वंस आपण केला याची जाणीव त्यास झाली. त्याला पश्चाताप झाला आणि इथून पुढे प्रजेची काळजी घेऊन तिला सुख देणे हेच त्याने ध्येय ठरवले.त्याने शांती आणि अहिंसेचा विचार स्वीकारत बौद्ध धम्म स्वीकारला. जीवनात सर्वांचे हित करणे हेच महत्वाचे असते. याची प्रचीती त्याला आली. युद्ध जिंकल्यानंतर युद्धाचा त्याग करणारा तो इतिहासातील एकमेव राजा होता. आज त्यांचा मूल्यविचार देशाचा विचार झाला आहे. कल्याणमार्ग सांगणारे आणि शांती प्रगती ,समृद्धीचे प्रतिक अशोक चक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी आहे आणि 'सारनाथचा चार सिंह असलेला स्तंभ' भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे.
अशोकाची कामगिरी केवळ साम्राज्य विस्तारापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी कल्याणाशी जोडलेली होती: त्यांने 'धम्म' (नैतिक आचारसंहिता) ही संकल्पना मांडली, ज्यामध्ये अहिंसा, सत्य आणि वडिलधाऱ्यांचा आदर यावर भर दिला होता. आपले विचार प्रजेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण साम्राज्यात दगडी स्तंभ आणि खडकांवर लेख कोरले. रस्ते बांधणे, रस्त्यांच्या कडेला झाडे लावणे, विहिरी खोदणे, प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधणे आणि माणसे व प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये स्थापन करण्याचे काम केले.
अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले. त्यांनी तिथे बोधिवृक्षाची फांदी लावली आणि श्रीलंकेला बौद्ध राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावली. अशोकाने आपले दूत सीरिया, इजिप्त, ग्रीस (मॅसेडोनिया) आणि सायरीन यांसारख्या ग्रीक राजांच्या राज्यांत पाठवले. सुवर्णभूमी म्यानमार आणि थायलंड या भागातही धम्मप्रचारक पाठवण्यात आले. नेपाळ आणि काश्मीरच्या दुर्गम भागात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी विशेष भिक्खू पाठवले.अशोकाने धम्माचा प्रसार करण्यासाठी शासनात एक नवीन पद निर्माण केले. धम्म महामात्र हे विशेष अधिकारी होते ज्यांचे काम लोकांमध्ये जाऊन त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे व विविध धर्मांमधील वाद मिटवणे आणि कैद्यांच्या कल्याणासाठी काम करणे हे होते.यामुळे धम्म हा केवळ धार्मिक विषय न राहता शासकीय धोरणाचा भाग बनला. संपूर्ण साम्राज्यात मुख्य रस्त्यांवर आणि धार्मिक स्थळांवर त्यांनी ८४,००० स्तूप बांधल्याचे मानले जाते.त्यांनी संस्कृतऐवजी सामान्य लोकांच्या पाली भाषेत संदेश कोरले, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला धम्म समजेल. त्यांनी प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातली आणि मांसाहाराचा त्याग करण्याचे आवाहन केले.., आणि विशेष म्हणजे माणसे व प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये सुरू केली.सम्राट अशोकाने बौद्ध धम्माला एका छोट्या संप्रदायातून बाहेर काढून त्याला मानवतावादी जागतिक धर्म बनवले. त्यांनी "शस्त्राने विजय मिळवण्याऐवजी "धर्माने विजय" (धम्मघोष) मिळवण्याचे धोरण जगभर राबवले.सम्राट अशोकाचे शिलालेख हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहेत.
त्यांनी कोरलेल्या स्तंभ लेख व लघु लेखात सम्राट अशोकाने आपले विचार प्रसारित केले आहेत. पहिल्या शिलालेखात "देवानांपिय पियदसी राजा" असे आदेश देतो की, कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करून यज्ञ करू नये. तसेच, समाजात (उत्सवांत) होणारा अनावश्यक खर्च टाळावा. पूर्वी राजवाड्याच्या स्वयंपाकघरात हजारो प्राणी मारले जात, आता फक्त दोन मोर आणि एक हरिण मारले जाते, भविष्यात हे देखील बंद होईल.असे ते म्हणतात .दुसऱ्या शिलालेखात चोल, पांड्य, सत्यपुत्र, केरळपुत्र आणि ग्रीक राजा अंतियोकसच्या राज्यात माणसांसाठी ,प्राण्यांसाठी जनकल्याण आणि वैद्यकीय सुविधा केली. रस्त्यांच्या कडेला विहिरी खोदल्या. आणि झाडे लावली असा उल्लेख आहे. तिसरया शिलालेखात युक्त, रज्जूक आणि प्रादेशिक या अधिकाऱ्यांनी दर पाच वर्षांनी साम्राज्याचा दौरा करावा असा आदेश दिला आहे. माता-पित्यांची सेवा करणे, मित्रांना आणि ब्राह्मणांना दान देणे, अल्प खर्च आणि अल्प साठा करणे हाच धम्म आहे असे लिहिले आहे. चौथ्या शिलालेखात अनेक वर्षांपासून चालत आलेली युद्धे आणि प्राण्यांची हत्या आता थांबली असे सांगून लोकांनी आता स्वर्गीय विमानांची दर्शने घेण्यापेक्षा नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात. पाचव्या शिलालेखात चांगले काम करणे कठीण असते.असे सांगून मी राज्याभिषेकाच्या १३ व्या वर्षी 'धम्म महामात्र' नावाच्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते जनतेच्या कल्याणासाठी, कैद्यांच्या सुटकेसाठी आणि कुटुंबांच्या मदतीसाठी काम करतील असा विश्वास त्यांनी दिला आहे. सहाव्या शिलालेखात मी कुठेही असो—जेवताना, शयनकक्षात किंवा बागेत—प्रजेच्या तक्रारी आणि कामांची माहिती मला त्वरित द्या. लोकहित हेच माझे सर्वात मोठे कर्तव्य आहे असे अशोक सांगतो. सातव्या शिलालेखात सर्व धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांनी एकत्र राहावे. प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात असे म्हणत सर्व धर्मांच्या मतांचा आदर अशोक करतात. सर्व माणसांच्या धर्माचे मूळ तत्व 'आत्मसंयम' आणि 'चित्तशुद्धी' हेच असायला हवे ही अपेक्षा त्यांनी केली आहे. आठव्या शिलालेखात पूर्वी राजे शिकारीसाठी (विहार यात्रा) जात असत. पण मी राज्याभिषेकाच्या १० व्या वर्षी 'बोधगया' येथे भेट दिली आणि तेव्हापासून 'धम्म यात्रा' सुरू केल्या आहेत असा उपक्रम सुरु केल्याचे ते नोंदवतात आणि या यात्रेत वृद्ध, ब्राह्मण आणि गरिबांना भेटून चर्चा करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगतात. लोक आजारपणात, लग्नात किंवा प्रवासाला जाताना अनेक विधी करतात, जे निरर्थक आहेत असे त्यांना वाटते .
खरे म्हणजे दासांशी चांगले वागणे, गुरूंचा आदर करणे आणि प्राण्यांवर दया करणे हे धम्मयात्रेचे वैशिष्ट्य असावे असे ते ठामपणे मांडतात . सम्राट अशोक कीर्ती किंवा गौरवाची इच्छा धरत नाहीत . प्रजेने धम्माचे पालन करणे हीच केवळ खरी कीर्ती आहे, भविष्यातील पिढ्यांनी मोहापासून दूर राहावे. असा सल्ला ते देतात. धम्माच्या दानासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ दान नाही. जो मनुष्य स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगून दुसऱ्याच्या धर्माची निंदा करतो, तो प्रत्यक्षात स्वतःच्याच धर्माचे नुकसान करतो. सर्व धर्मांच्या सारतत्त्वाचा विकास झाला पाहिजे हे त्यांचे मत तर जगाने स्वीकारले तर जगातील सर्व भांडणे संपुष्टात येतील. १३ व्या शिलालेखात कलिंग युद्धातील भीषण नरसंहाराचे वर्णन आहे. या युद्धानंतर राजाला प्रचंड दुःख झाले. त्याने युद्धाचा त्याग करून 'धम्म विजया'चा संकल्प केला हे लिहिले. सम्राट अशोक आपल्याला हे शिकवतात की, "तलवारीने मिळवलेला विजय हा तात्पुरता असतो, पण प्रेमाने आणि नैतिकतेने मिळवलेला विजय हा अजरामर असतो.
आज जग जेव्हा हिंसेच्या उंबरठ्यावर उभे आहे, तेव्हा अशोकाचा 'मध्यम मार्ग' हाच मानवाच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.आज इराण-अमेरिका ,इस्त्रायल किंवा रशिया, युक्रेनसारखी युद्धे जगातल्या सर्व माणसाचे दुःख वाढवीत आहेत . मोठेपणाच्या नादात संपत्तीचे नुकसान होत ,जगाला कसे संकटात टाकले आहे. लोकशाही असूनही विचार विनिमय ऐवजी शस्त्रांनी माणसे मारणे आणि त्त्यांच्या संपत्तीचे नुकसान करणे हे चालू असताना चक्रवर्ती सम्राट यांनी अहिंसा व शांतीचा व लोकहिताचा विचार करून जगाला किती महान प्रेरणा दिली हे दिसून येते.
शिलालेखाचे अभ्यासक प्रसिद्ध जागतिक इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी त्यांच्या 'The Outline of History' या ग्रंथात म्हणतात "इतिहासाच्या पानावरील हजारो राजांच्या नावांमध्ये, सम्राट अशोकाचे नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकत आहे. तो केवळ भारताचाच नव्हे, तर जगाचा महान सम्राट होता."नेहरूंनी त्यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (Discovery of India) या पुस्तकात अशोक हा असा राजा होता ज्याने विजयानंतर युद्धाचा त्याग केला आणि मानवी कल्याणाचा मार्ग निवडला."डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोकाला 'प्रबुद्ध भारताचा' निर्माता मानले. त्यांच्या मते, अशोकाचे राज्य हे केवळ भौगोलिक सीमांचे राज्य नव्हते, तर ते 'न्याय, समता आणि बंधुता' या मूल्यांवर आधारित एक नैतिक साम्राज्य होते. भारतीय संविधानात ,आणि जगातल्या विविध नियमात सम्राट अशोक यांची कल्याणकारी नीती आपल्याला दिसून येते. संविधानाचे कलम १४ ते १८ हे नेमके याच विचारावर आधारित आहे. सर्वांना कायद्यासमोर समान मानणे आणि भेदभाव नष्ट करणे ही अशोकाचीच स्वप्ने आधुनिक रूपात संविधानात दिसतात.. दुसऱ्याच्या धर्माची निंदा करणे म्हणजे स्वतःच्या धर्माचे नुकसान करणे, असे त्यांनी म्हटले होते.
सर्व पंथांच्या लोकांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे.भारताने स्वीकारलेली 'धर्मनिरपेक्षता' ही नेमकी हीच संकल्पना आहे. संविधानानुसार राज्य कोणत्याही एका धर्माला श्रेष्ठ मानत नाही आणि सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देते..त्यांनी शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. युद्धामुळे होणारा विनाश टाळून शांततेने प्रश्न सोडवणे याला अशोकाने महत्व दिले.संविधानातील कलम ५१ (मार्गदर्शक तत्वे) हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी राज्याने प्रयत्न करावेत, असे सांगते. ही पूर्णपणे अशोकाच्या 'अहिंसा' तत्त्वाची आधुनिक आवृत्ती आहे.प्रजेचे सुख हेच राजाचे सुख, असे त्यांनी मानले आज संविधानातील 'राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे' (Directive Principles of State Policy) सरकारला आदेश देतात की त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य,आर्थिक मदत इत्यादी काम करावे.बुद्धांच्या अहिंसेच्या तत्त्वाचा अशोकावर इतका प्रभाव होता की त्यांनी स्वतः शिकार करणे सोडून दिले आणि राजवाड्याच्या स्वयंपाकघरात होणारी प्राण्यांची हत्या पूर्णपणे बंद केली.
अशोकाचा 'धम्म' हा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गावरच आधारित होता. सदाचार, सत्य, आणि इंद्रिय संयम यावर त्यांनी भर दिला.अशोकाने बुद्धांचे विचार 'लोकधम्म' म्हणून लोकांसमोर मांडले. त्यांनी कठीण तत्वज्ञानापेक्षा सामान्य माणसाला समजेल अशा 'नैतिक आचारसंहिते'वर भर दिला.बुद्धांनी सांगितलेली 'मैत्री' आणि 'करुणा' ही मूल्ये महत्वाची मानली..अशोकाने बौद्ध संघाला राजाश्रय दिला, पण तो देताना इतर धर्मांचा द्वेष केला नाही.सर्व प्राणिमात्रांवर दया करणे) हे अशोकाचे मुख्य सूत्र होते. त्यांनी रस्ते, विहिरी आणि झाडे लावून निसर्गाचे रक्षण केले.भारतीय नागरिकांच्या कर्तव्यात तलाव, नद्या व वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हा विचार आला आहे केवळ मानवाचाच नाही, तर निसर्ग आणि मुक्या प्राण्यांच्या अधिकारांचा विचार दोन्ही ठिकाणी दिसून येतो सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे ,समाजात शांतता प्रस्थापित करणे हे अशोकाच्या मूल्याचे संस्कार आहेत.
अशोकाने अंधश्रद्धा आणि निरर्थक कर्मकांडांऐवजी 'सदाचार' आणि 'तर्कशुद्ध' वागण्याला महत्त्व दिले . भारतीय संविधानात नागरिक कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी यांचा विकास करणे. हा महत्वाचा विचार आहे. बुद्धांचा 'कार्यकारणभाव' अशोकाने धम्मात आणला जो आज संविधानात 'वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणून ओळखला जातो. त्याचे प्रशासन हे जगाच्या इतिहासातील व्यवस्थापन व नियोजना'चा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. त्यांनी धम्मास मानवतावादी जीवनपद्धती' म्हणून उभे केले 'धम्म महामात्र' लोकांच्या नैतिक जीवनावर लक्ष ठेवणे, विविध संप्रदायांमध्ये सलोखा राखणे आणि कारागृहातील कैद्यांनाही न्याय मिळवून देणे हे तत्व स्वीकारले. आज अमेरिका आणि युरोपमध्ये 'माइंडफुलनेस' (Mindfulness) आणि 'मेडिटेशन' या नावाखाली बुद्ध विचार घराघरांत पोहोचला आहे.जगात सर्वात 'शांतताप्रिय' आणि 'सन्माननीय' धर्म म्हणून आजही बौद्ध धम्माचे नाव प्रथम घेतले जाते. संयुक्त राष्ट्र (UN) देखील बुद्धांच्या विचारांना जागतिक शांततेचा एकमेव मार्ग मानते.