नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

by Team Satara Today | published on : 29 June 2026


पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज, सोमवारी ऐतिहासिक फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली असून, "आता फासावर चढा" अशा कडक शब्दांत न्यायाधीशांनी हा निकाल जाहीर केला.

​१ मे रोजी घडलेल्या या अमानुष आणि काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत तपास पूर्ण करत न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले होते. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानेही या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेत अवघ्या काही दिवसांतच आरोपीला दोषी ठरवले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वपूर्ण निकालांचे दाखले देत आरोपीला कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली होती.

​न्यायालयाने भारतीय संविधान, भारतीय न्याय संहिता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा सखोल अभ्यास करून हा ऐतिहासिक निर्णय दिला. गुन्ह्याचे अमानुष स्वरूप, पीडितेचे कोवळे वय, अत्याचारानंतर झालेली तिची अत्यंत निर्घृण हत्या आणि या घटनेचा समाजावर झालेला गंभीर परिणाम या सर्व बाबी न्यायालयाने निकाल देताना विचारात घेतल्या.

​सोमवारी न्यायालयात ही अंतिम शिक्षा जाहीर होताच संपूर्ण कोर्टरुममध्ये काही क्षणांसाठी कमालीची शांतता पसरली. फाशीची शिक्षा ऐकताच आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर हतबल होऊन हात जोडले. या कठोर आणि ऐतिहासिक निर्णयानंतर पीडित चिमुकलीच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना आता व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिरवळमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या युवकाला अटक; १५ ग्रॅम 'एमडी'सह बुलेट जप्त
पुढील बातमी
पुढील वर्षीची आषाढी यात्रा कॉरिडॉरमध्ये भरविण्यात येईल; ३,९९३ कोटी ९० लाख रुपयांचा कॉरिडॉरचा आराखडा तयार - ना. जयकुमार गोरे

संबंधित बातम्या