दूध संघाचा नव्हे, हा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संसाराचा लिलाव : रणजितसिंह नाईक निंबाळकर

by Team Satara Today | published on : 21 September 2026


फलटण : सव्वातीन कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी फलटण तालुका दूध संघाची पाच एकर मौल्यवान जमीन लिलावात काढणे म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संसाराचा लिलाव मांडण्यासारखे असून, जमीन विकण्याऐवजी दूध संघ पुन्हा उभा करण्याची संधी द्यावी, अशी आक्रमक भूमिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
एकेकाळी तालुक्याचे वैभव आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक आधार असलेला फलटण तालुका सहकारी दूध संघ सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या कर्जफेडीसाठी सहकार खात्याकडून संघाची पाच एकर जमीन लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, जर खासगी दूध कंपन्या तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा नफा कमावून व्यवसाय करू शकतात, तर मग शेतकऱ्यांचा सहकारी दूध संघ का चालू शकत नाही? सुभाष शिंदे यांच्या काळात याच संघात दररोज १ लाख १० हजार लिटरपर्यंत दूध संकलन होत होते. मात्र, गेल्या तीस वर्षांतील चुकीच्या धोरणांमुळे संघ डबघाईस आला असून, आज प्रत्यक्ष संकलन पूर्णपणे ठप्प असताना केवळ कागदोपत्री दररोज पाच हजार लिटर दूध संकलन दाखवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे.
तीन वर्षांपूर्वीच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन संस्थेची जमीन विक्री न करता अडीच कोटी रुपये उभे करून दूध संघ नव्याने चालवण्याची तयारी आपण दर्शवली होती, याची आठवण करून देत कर्जफेडीसाठी जमीन विकणे हा अजिबात अंतिम पर्याय असू शकत नाही, असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे कारखान्यासाठी सभासदांकडून पैसे गोळा केले जातात, त्याच धर्तीवर तालुक्यातील दूध संघ लिलावापासून वाचवण्यासाठीही निधी उभा करून हा संघ पूर्ववत सुरू करण्याची संधी दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरूनही भूमिका स्पष्ट केली. श्रीराम कारखाना सहकाराच्या तत्त्वावर चालवण्यास आपला कोणताही विरोध नाही, मात्र खासगी व्यक्तीच्या माध्यमातून तो चालवून सहकार मोडीत काढण्याच्या प्रवृत्तीला आपला ठाम विरोध आहे, असे ते म्हणाले. तालुक्यात २० ते २५ लाख टन ऊस उपलब्ध असून कारखान्याला तालुक्यातून व बाहेरून सहज ७ ते ८ लाख टन ऊस मिळू शकतो. असे असताना आम्ही कारखान्याला विरोध करत असल्याचा जाणीवपूर्वक खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संघाचे माजी चेअरमन भीमदेव बुरुंगले यांनीही संघाच्या वाटचालीचा दाखला दिला. सुरुवातीच्या काळात संघ उत्कृष्ट चालत असताना खासगी स्पर्धा आणि गुणवत्तेच्या निकषांमुळे अडचणी आल्या, मात्र राजे गटाच्या हाती सत्ता आल्यानंतर आवश्यक खर्च करून दूध संकलन ५६ हजार लिटरपर्यंत नेऊन संघ फायद्यात आणला होता, असा दावा त्यांनी केला. मात्र पुढील निवडणुकीत आपला पत्ता कट झाल्यानंतर संघ पुन्हा तोट्यात कसा गेला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तत्कालीन नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकर्‍यांसाठी पाणी म्हणजे स्वप्न आणि जगण्याचा आधार आ. महेश शिंदे यांच्या हस्ते नेर उपसा जलसिंचन योजना क्रमांक 3 च्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

संबंधित बातम्या