आपली फलटण मॅरेथॉन २०२६ ची दशकपूर्ती : २५ ऑक्टोबरला आरोग्य आणि आनंदासाठी धावणार फलटणकर

by Team Satara Today | published on : 18 September 2026


फलटण : बदलत्या जीवनशैलीत आरोग्याविषयी सजगता निर्माण व्हावी आणि नियमित व्यायामाची सवय लागावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या 'आपली फलटण मॅरेथॉन २०२६' या उपक्रमाची यंदा दशकपूर्ती होत आहे. त्यानिमित्त रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता फलटण येथील सजाई गार्डन येथे आरोग्य आणि आनंदाचा हा अनोखा क्रीडा महोत्सव रंगणार आहे.
जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी आणि डॉ. प्राची प्रसाद जोशी यांच्या संकल्पनेतून ही आरोग्य चळवळ राबवली जात आहे. यंदाच्या मॅरेथॉनची मध्यवर्ती संकल्पना 'आरोग्य आणि आनंदासाठी धावा' (Run for Health & Happiness) अशी निश्चित करण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ धावण्यापुरता मर्यादित न राहता याद्वारे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जनजागृती करणे तसेच अवयवदानाचा व्यापक संदेश जनमानसात पोहोचवणे हाही मुख्य हेतू आहे.
या मॅरेथॉनमध्ये धावपटूंसाठी २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा स्पर्धात्मक फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १८ ते ३० वर्षे (जोशपूर्ण युवा गट), ३१ ते ४५ वर्षे (सळसळती तरुणाई), ४६ ते ५५ वर्षे (प्रगल्भ प्रौढ) आणि ५६ ते ६४ वर्षे (अनुभवी ज्येष्ठ) असे चार वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय यंदा प्रथमच १२ वर्षांवरील धावपटूंसाठी ३ किलोमीटरची आनंद फेरी (फन रन) समाविष्ट करण्यात आली आहे. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किलोमीटरची वॉकेथॉन पूर्णपणे मोफत असणार आहे.
यंदाच्या मॅरेथॉनचे सर्वांत मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (‘विठू रोबो’) गुडघे प्रत्यारोपण झालेल्या देशभरातील ७५० हून अधिक रुग्णांची होणारी ३ किलोमीटरची विशेष चालण्याची फेरी. भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार असून, उपचारांनंतरही सक्रिय जीवन जगता येते असा सकारात्मक संदेश यातून दिला जाणार आहे.
स्पर्धकांचा धावण्याचा मार्ग हा ऊस, द्राक्षबागा आणि शेतशिवारामधून जाणारा अत्यंत निसर्गरम्य असा असणार आहे. मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि जलपानाची चोख व्यवस्था करण्यात आली असून धावण्यापूर्वी ऊर्जादायी झुंबा सराव आणि धावल्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला आकर्षक टी-शर्ट, वेळ नोंदवणारी टाईम चिप, टोपी, एनर्जी बार आणि उपयुक्त भेटवस्तूंचा समावेश असलेले मॅरेथॉन किट दिले जाईल.
चारही प्रमुख वयोगटांतील पहिल्या तीन क्रमांकांच्या महिला व पुरुष विजेत्यांसाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून अशी एकूण ६० बक्षिसे दिली जाणार आहेत. या मॅरेथॉनसाठी नोंदणी शुल्क पुरुषांसाठी ७५० रुपये अधिक कर, महिलांसाठी ५०० रुपये अधिक कर, तर ३ किमी आनंद फेरीसाठी ३०० रुपये निश्चित केले आहे. ऑनलाईन नोंदणी १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत alpharacingsolution.com/e/apli-phaltan-marathon-2026 या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करता येणार आहे. फलटण परिसरातील नागरिक, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संबंधित बातम्या