फलटण : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुकारलेले तीव्र ठिय्या आंदोलन अखेर प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मांडवे (ता. माळशिरस) येथे रवाना करण्यात आले.
डॉ. रुपनवर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, उपचारादरम्यान ३० ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांचे पार्थिव मुंबईहून फलटण येथे आणल्यानंतर, आरोपींना अटक झाल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांचे बंधू सागर रुपनवर आणि नातेवाईकांनी घेतली. संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास रुग्णालयासमोरच अंत्यविधी करण्याचा इशारा देत आंदोलकांनी लाकडे आणल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते.
या प्रकरणाचे पडसाद मुंबईपर्यंत उमटले असून मार्ड संघटनेसह वरिष्ठ पातळीवर तातडीच्या बैठका पार पडल्या. फलटणमध्ये पोलीस, आरोग्य विभाग, प्रशासन आणि कुटुंबीय यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, आरोपींना तातडीने बेड्या ठोकाव्यात आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. तसेच निलंबित वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीला मदने यांना चौकशीअंती दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कुटुंबीयांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
लहानपणीच आईचे छत्र हरपल्याने डॉ. रुपनवर यांचे बालपण मांडवे येथील मामांकडे अत्यंत संघर्षात गेले होते, त्यामुळे त्यांच्यावर मांडवे येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. फलटणहून पार्थिव मांडवेकडे नेत असताना फलटण-पंढरपूर मार्गावर हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून डॉ. रुपनवर यांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. या मार्गावर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात ठेवला होता. तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरण: प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; पार्थिव मांडवेकडे रवाना
by Team Satara Today | published on : 02 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा