डॉ. भगवान पवार, डॉ. लीना मदने यांच्यासह पाच जणांना तत्काळ अटक करा; फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश

by Team Satara Today | published on : 01 September 2026


फलटण : उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने यांच्यासह संबंधित पाच जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, या मागणीसाठी डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक व हजारो नागरिकांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र जनआक्रोश आंदोलन करत ठिय्या मांडला.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन येथे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान ३० ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद फलटण आणि माळशिरस तालुक्यात उमटले. या प्रकरणात आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीना मदने, माजी मंत्र्यांचे कथित पीए प्रसाद कोंडे-देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचे कथित पीए दत्तात्रय मोहिते तसेच कुमार परदेशी यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंदवून अटक करण्याची मागणी करत नातेपुते, माळशिरस आणि सदाशिवनगर परिसरातील संतप्त ग्रामस्थ व नातेवाईक फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर एकवटले.
या जनआक्रोश आंदोलनामुळे बारामती चौक व उपजिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी भर उन्हात रस्त्यावरच ठिय्या मारून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) निष्पक्ष चौकशी करावी, डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक भरपाई द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी लावून धरली. तसेच धमकी व धक्काबुक्कीच्या घटनेवेळी उपस्थित असणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय मोहिते यांनाही या प्रकरणात थेट सहआरोपी करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप दिले असून येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. आंदोलनादरम्यान रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहिला असला तरी अतिदक्षता विभाग पूर्ववत सुरू ठेवण्यात आला होता. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डॉ. रुपनवर यांना श्रद्धांजली वाहणारा फलक लावण्यात आला होता, ज्यामुळे कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, जोपर्यंत संबंधित सर्व संशयितांवर कठोर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत डॉ. रुपनवर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांचे बंधू सागर रुपनवर आणि कुटुंबीयांनी घेतला असून रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळायलाच नको; सुप्रीम कोर्टाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना फटकारले, समोर दिसेल त्या व्यक्तीला मारहाण करणार का?
पुढील बातमी
गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद करण्याची ग्वाही

संबंधित बातम्या