फलटण : जमिनीचे भोगवटादार वर्ग दोनवरून वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यासाठी बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील मौजे कोळकी येथील गट नंबर 79/1/1, 79/1/5 आणि 80/1 या जमिनीच्या भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्जदार रणधीर धनसिंगराव भोईटे यांनी फलटण तहसील कार्यालयात अर्ज सादर केला होता. या अर्जासोबत सह दुय्यम निबंधक वर्ग-2 फलटण यांच्या कार्यालयाचा बनावट मूल्यांकन दाखला जोडून कमी नजराणा रक्कम भरून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला असता सादर केलेला दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रणधीर धनसिंगराव भोईटे, निखिल रामदास देवकर, प्रवीण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि वीरेंद्र विक्रम झांजुर्णे या आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी रणधीर भोईटे, राजेंद्र कापसे आणि विक्रम झांजुर्णे यांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.