देशी बनावटीच्या पिस्तुल, काडतुसासह दोन जणांना अटक

1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त; फलटण शहर पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 19 August 2026


फलटण : फलटण शहर पोलिसांनी एक धडक कारवाई करत देशी बनावटीच्या पिस्तुलसह दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई 16 ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेजवळ सापळा रचून करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून एकूण 1 लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनशाम बल्लाळ यांना एका गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती की, दोन व्यक्ती विना नंबरच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून पिस्तुल विकण्याच्या उद्देशाने फलटण शहरात येत आहेत. या बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आणि डी.बी. पथकाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.  

पोलीस पथकाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ रचलेल्या सापळ्यात विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाच्या कमरेला खोचलेले 50 हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि त्यात 200 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे शस्त्र, काडतूस आणि 1 लाख 15 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची विना नंबरची युनिकॉर्न मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला.  

या प्रकरणी जय दयानंद मागाडे (वय 20 वर्षे, रा. आंबेडकरनगर, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) आणि प्रदिप संतोष गोरे (वय 22 वर्षे, रा. खामगाव रोड, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिंदे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी
पुढील बातमी
फलटणमधील गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा कडक प्रहार; 10 जण हद्दपार

संबंधित बातम्या