फलटण तालुक्यात मांजा ठरला गांजापेक्षा घातक

मांजा विक्रेत्यांकडून मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; एसपींकडून सुओ मोटो कारवाई अपेक्षित

by Team Satara Today | published on : 10 August 2026


फलटण : फलटण शहर आणि तालुक्यात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर चायनीज मांजाचा फास आवळत चालला असून एकाच आठवड्यामध्ये तब्बल दोघेजण चायनीज मांजामुळे गंभीर जखमी झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात एकवेळ गांजा परवडला, पण चायनीज मांजा नको रे बाबा, अशा चर्चा झडू लागल्या आहेत.

​गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुका चायनीज मांजासाठी कुप्रसिद्ध ठरलेला आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या आसपास नागपंचमी हा सण येत असतो. परंपरेनुसार नागपंचमीच्या आधीच पंधरा दिवस आणि नंतरही काही दिवस आकाशामध्ये पतंग उडवतात. हे पतंग उडवण्यासाठी अबालवृद्ध सहभागी होत असतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पतंग उडवण्याचे स्वरूप बदलले. पतंग उडवणे आणि त्यातून दुसऱ्याची पतंग काटणे, ही जणू स्पर्धाच सुरू झाली.

​पूर्वी दुसऱ्या भिडूची पतंग आकाशातच कापण्याचा आणि त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. साध्या धाग्याला काचेच्या बाटलीचा भुगा चिकट पदार्थांमधून लावला जात होता. परंतु हा धागा तुटल्यानंतर लोकवस्तीमध्ये कोणालाही इजा होत नव्हती. मात्र, गेल्या दशकभरामध्ये पतंग उडवण्याचे स्वरूप बदलले. बाजारामध्ये चायनीज मांजा प्रसिद्ध होऊ लागला. भारतीय बनावटीच्या धाग्याच्या तुलनेत हा धागा अतिशय मजबूत व टिकाऊ होता. तसेच आकाशातच प्रतिस्पर्ध्याची पतंग काही क्षणातच काटली जात असल्याने अनेकांचा कल हा धागा विकत घेण्याकडेच वाढत जाऊ लागला. चायनीज मांजाच्या वाढत्या मागणीमुळे फलटण शहरातील मांजा विक्रेत्यांनी साधा धागा विकणेच बंद करून चायनीज मांजाचीच मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. फलटण शहरातील विमानतळ तसेच घडसोली मैदान, यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात.

​गेल्या दशकभरामध्ये पतंगाच्या काटलेल्या धाग्यामुळे काहीजण गंभीर जखमी होऊन दगावलेलेसुद्धा आहेत. पोलिसांनी यानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आपली जबाबदारी झटकलेली आहे. याबाबत नक्की कारवाई कोणावर करायची? कारण, पतंग उडवणारे एक-दोन नव्हे तर शेकडो-हजारो असतात. त्यामुळे चायनीज मांजाने जखमी झाल्यानंतर किंवा दगावल्यानंतर नक्की कारवाई कोणावर करावी, असा प्रश्न फलटण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे.

​याच आठवड्यात ५ ऑगस्ट रोजी चायनीज मांजामुळे माजी सैनिक असलेले शिवाजी मुगुटराव बुधावले हे डेक्कन चौक परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्यांच्या गळ्याला धारदार मांजाने कापल्याने ते गंभीर जखमी झाले होते, तर काही दिवसांपूर्वी दत्तादादा जाधव रा. कुर्णेवाडी, ता. बारामती हे कामानिमित्त फलटण शहरात आलेले असताना सोमवार पेठ परिसरातून दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर अडकलेला धारदार चायनीज मांजा त्यांच्या गळ्यात अडकल्याने तेही गंभीर जखमी झाले होते. आणि विशेष म्हणजे कालच दि. ९ रोजी भाडळे खुर्द, ता. फलटण येथे चायनीज मांजामुळेच विडणी, ता. फलटण येथील एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आलेली आहे.

​दरवर्षी चायनीज मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. परवाच फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु मुख्याधिकाऱ्यांचाच आदेश मांजा विक्रेत्यांनी फाट्यावर मारत फलटण शहरात राजरोसपणे चायनीज मांजाची विक्री चालूच ठेवली आहे.

​एकूणच चायनीज मांजा विक्रेत्यांमध्ये कायद्याचा धाकच उरला नसून याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी संबंधित विक्रेत्यांवर सुओ मोटो कारवाई करून चायनीज मांजा फलटण तालुक्यातूनच हद्दपार करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; राज्यात पुन्हा खळबळ
पुढील बातमी
कौटुंबिक वादातून कराडमध्ये पतीकडून पत्नीचा धारदार शस्त्राने खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या