फलटण : फलटण ग्रामीण भागात रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी तब्बल दोन किलोमीटर पाठलाग करून कुरवली तलावाजवळील ऊसाच्या शेतातून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत लुटमार व चोरीसाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, तिघे संशयित फरार झाले आहेत.
राहुल नाना भुले, रा. इंदिरानगर, मलटण, ता. फलटण, जि. सातारा आणि नंदकुमार भागोजी सोनवणे, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मांडवखडक, ता. फलटण गावच्या हद्दीत हॉटेल बाणगंगाच्या बाजूला काही संशयित रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तातडीने संबंधित ठिकाणी दाखल झाले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच तेथे पाच संशयित आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर कुरवली तलावाजवळील ऊसाच्या शेतात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेले अन्य तीन संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून लुटमार तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींचा फलटण ग्रामीण परिसरातील यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. अटक आरोपींची चौकशी तसेच फरार आरोपींचा शोध घेतल्यानंतर ग्रामीण भागातील आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकजकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनायक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दहस आणि तुषार नलवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.