फलटण : फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या हद्दीत गावठी हातभट्टीच्या दारू अडड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी 2 लाख 46 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिले आहेत. या मार्गदर्शनानुसार फलटण परिसरात पोलिसांकडून कडक पाळत ठेवली जात आहे. यादरम्यान आज सस्तेवाडी गावच्या हद्दीत काहीजण गावठी हातभट्टीची दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता तातडीने कारवाईचे चक्र फिरवले.
पोलीस निरीक्षक भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने सस्तेवाडी येथील संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांचा हा छापा इतका अनपेक्षित होता की आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. या छाप्यादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून 280 लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू मिळून आली. याशिवाय दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, ज्यामध्ये दोन लोखंडी कढई, जरमलचे काळे-पांढरे रंगाचे घमेले, बाभळीच्या झाडाची साल, गुळाच्या ढेपा, तुरटी आणि जळण असा एकूण 2 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) याला रंगेहात पकडून अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सामील असलेले त्याचे इतर साथीदार कृष्णा ऊर्फ पप्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (सर्व रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, हवालदार खरात, हवालदार चतुरे, हवालदार कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल दडस यांनी सहभाग घेतला.