फलटण : घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबप्रमुखाला वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडली.
खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे शिंदे कुटुंब बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे उठून घराबाहेर आले होते. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक वीज प्रवाह उतरल्याने पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना जोरदार झटका बसला. त्यांना वाचविण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, वाचविण्यास गेलेले तिघेही जण एकापाठोपाठ एक त्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले आहेत. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये नेमका वीज प्रवाह कसा आला, यामागे महावितरणचा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा सखोल तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडून केला जात आहे. एकाच घरातील चार कर्ते व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.