खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कडक कारवाई करा; फलटणमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे तहसीलदारांना निवेदन

by Team Satara Today | published on : 30 June 2026


फलटण: पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे मुजोर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी फलटण येथील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि गृहविभागाने खासदारांवर तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या पाच खासदारांपैकी संजय दिना पाटील हे एक असून, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी काही पत्रकार त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी काही अडचणीचे प्रश्न विचारताच खासदार पाटील संतप्त झाले. त्यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ करत, "परत आलात तर मारून टाकीन, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा" अशी अर्वाच्च आणि अरेरावीची भाषा वापरली.

​विशेष म्हणजे संजय दिना पाटील यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा व्यवस्था लाभलेली असताना, त्यांनी थेट पोलिसांसमोरच पत्रकारांना अशा प्रकारची धमकी दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. एका लोकप्रतिनिधीला आणि खासदाराला न शोभणारी ही भाषा अत्यंत संतापजनक व निषेधार्ह असून, त्यांची ही सुरक्षा व्यवस्था त्वरित काढून घेण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

​यापूर्वीही संजय दिना पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून "माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्याकडे निदर्शने करायला कोणी आले तर बॉम्ब टाकेन, तसेच मी पाच खून केलेले आहेत" अशी धक्कादायक विधाने केली होती. स्वतःला खासदार म्हणवून घेणारी व्यक्ती स्वतःकडे बॉम्ब असल्याची उघड धमकी देत असेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यांच्याकडे खरोखरच बॉम्ब आहे का आणि असल्यास तो कुठून आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही पत्रकार परिषदेकडून करण्यात आली आहे.

​या निवेदनावर फलटणमधील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मा. अरविंदभाई मेहता, यशवंत खलाटे, युवराज पवार, ॲड. रोहित अहिवळे, विनायक शिंदे, वैभव जगताप, अजय माळवे, सुभाष भांबुरे, सुधीर अहिवळे, विशाल शहा, वैभव गावडे, संजय गायकवाड, बाळासाहेब ननावरे, यशराज भांबुरे, मितेश (काकासाहेब) खराडे, अभिषेक सरगर, शक्ती भोसले, नसीर शिकलगार, प्रविण काकडे, सचिन मोरे, पोपट मिंड, दादासो चोरमले, प्रशांत रणवरे, शेखर जगताप, दीपक मदने या  पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी हे निवेदन स्वीकारले असून, यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी भावना फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार वर्गाने व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या पूररेषा प्रश्नावर अधिवेशनात गंभीर चर्चा ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केला प्रश्न
पुढील बातमी
रामराजे उद्यानाचे 'संत सगुणामाता' नामकरण; फलटण पालिकेत वादळी चर्चा, २१ विषयांना मंजुरी

संबंधित बातम्या