का? तर ते माझ्या जातीचे नव्हते

​खामगाव (फलटण) प्रकरणामध्ये जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता

by Team Satara Today | published on : 13 July 2026


खामगाव, ता. फलटण येथे दि. ८ जुलै रोजी भल्या सकाळी विद्युत प्रवाहाचा धक्का बसून एकाच कुटुंबातील चारजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरेतर ही अतिशय दुर्दैवी घटना फलटण तालुक्यात घडली. परंतु या घटनेला चार दिवस उलटूनही जिल्ह्यातील सोडाच, परंतु फलटण तालुक्यातील एकही आजी-माजी लोकप्रतिनिधी त्या उरलेल्या कुटुंबातील एकाही व्यक्तीच्या सांत्वना अगर मदतीसाठी फिरकला नाही. कारण काय असावे? ते पारधी होते? का ते त्यांच्या जातीचे नव्हते?

​सध्याच्या काळामध्ये जातीय अस्मिता टोकदार झालेली आहे. तो माझा, तो तुमचा असा दूजाभाव सरकारपासून प्रशासनामध्येही पहावयाला मिळतो. जातीपातीवरून अलीकडच्या काळात घडलेल्या घटना आतड्यांना पीळ देतात. तोच पीळ मात्र माणुसकीसाठी कोणीच देत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. ८ जुलै रोजी खामगावमधील एका इंग्रजी शाळेच्या बाजूला राहत असलेल्या शिंदे कुटुंबासाठी ती सकाळ शेवटची ठरली. या कुटुंबातील बीएससी उत्तीर्ण झालेली आरती शिंदे ही युवती पोलीस आणि लष्करामध्ये भरती होऊन देशसेवेची स्वप्ने पाहत होती. जन्मतःच गुन्हेगारीचा शिक्का माथी बसल्याने तो पुसण्यासाठी ती सरसावली होती. पोलीस भरती अभ्यासाबरोबरच ती मैदानी सरावही करीत होती. ८ जुलैच्या भल्या पहाटे काही किलोमीटर दौड मारल्यानंतर घरी येत असतानाच घराशेजारून गेलेल्या थ्री फेज विद्युत वाहिनीवरून टीव्ही केबलच्या ताणासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरून ती तार खाली पडली होती. सर्वप्रथम दौड मारून आलेल्या आरतीच्या निदर्शनास ती तार आल्यानंतर कसली तार आहे, असे म्हणत ती तार रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी आरतीने त्या तारेला स्पर्श केला. यानंतर आरतीला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तिला वाचविण्यासाठी तिचे वडील, आई आणि भाऊ सरसावले असता त्या तिघांनाही विजेच्या जोरदार प्रवाहाचा धक्का बसला आणि काही मिनिटांतच बहीण-भाऊ, आई-वडील जागीच मरण पावले. उपस्थितांपैकी कोणालाही मदत करण्याची संधीच मिळाली नाही.

​खामगावमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चारजण दगावल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. ‘सातारा टुडे’नेच सर्वप्रथम या घटनेची बातमी प्रकाशित केली होती. आता या घटनेलाही चार दिवस उलटून गेले आहेत. पारधी समाजातील गुन्हेगारीचा शिक्का पुसून खामगावमधील हे शिंदे कुटुंब उजळ माथ्याने समाजामध्ये फिरत होते. साखरवाडी परिसरामध्ये ऊसतोड करून शिंदे परिवाराने आपल्या कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षित केले होते. पारधी समाजातील ही अतिशय दुर्मिळ घटना. स्वतःच्या हिंमतीवर या कुटुंबाने गावातच काही गुंठे जमीन खरेदी करून त्या जागेवर मोठे आरसीसी घर उभे करण्याचे ठरवले होते. बांधकामाचे फाउंडेशनही तयार करण्यात आले होते. टोलेजंग घराचे स्वप्न बघत असतानाच या कुटुंबातील बहुतांश जणांना अपघाती, अकाली एक्झिट घ्यावी लागली. कष्टकरी, प्रामाणिक व लाघवी स्वभावाच्या शिंदे कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमुळे खामगाव-साखरवाडीसह पंचक्रोशीही गहिवरली.

​घटनास्थळी पोलीस पोहोचले. परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम पोलिसांनी केले असून महावितरणच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी दडपून दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक आणि अतिशय संतापजनक बाब समोर येत आहे. शेवटी, अपघात हा अपघात असतो. कोणीही जाणीवपूर्वक काहीच करीत नसतो. झाले, गेले म्हणून यंत्रणा आणि त्यास जबाबदार असणारे आपले हात झटकून मोकळे होतात. परंतु काळ सोकावू नये यासाठी संबंधितास शासन व्हायलाच पाहिजे. परंतु पारध्यांसाठी आपला वेळ खर्ची घालणार कोण? कारण ते ना माझे भाऊबंद, ना आप्तेष्ट. ना जातीचे, ना पातीचे.

​महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठाले दुर्दैवी अपघात झाले. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या अपघातानंतर शासनाने-प्रशासनाने त्यांच्या परिवारास तत्काळ मदत जाहीर करून मृतांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. एवढेच काय, काही महिन्यांपूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटामध्ये कोकणातून पर्यटन करून आलेल्या काही युवकांची कार दरीमध्ये कोसळली. यामध्ये सर्वच पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या अपघाताची दखल घेतली. लागलीच जिल्ह्यातील आमदार-खासदारांनी अपघातात मृत पावलेल्या युवकांच्या घरी सांत्वनासाठी रांग लावली. जिल्हा प्रशासनाने मृत युवकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, गेले चार दिवस उलटूनही खामगावमध्ये महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबाची जिल्ह्यातील तर सोडाच, पण फलटण तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी भेटच काय, पण साधे ढुंकूनही बघितले नाही.

​कुटुंबातील चारही कर्ती माणसे गेल्यामुळे उरलेली आहे, ती फक्त अपघातात मृत्यू पावलेल्या सतीश शिंदे याची सात महिन्यांची गर्भवती असलेली पत्नी आणि दोन वर्षांचे छोटे लेकरू.

​काल दि. १० जुलै रोजी मी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पत्रकार आहे, असे सांगितल्यानंतर सतीश शिंदे याच्या गर्भवती पत्नीने व नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. "साहेब, आम्हाला न्याय द्या... आमचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे. पोटातील सात महिन्यांच्या बाळासह या लेकराला कुठे घेऊन जाऊ?" असा प्रश्न त्या माऊलीने केला. झोपडीच्या दारातच ते दोन वर्षांचे छोटे लेकरू कोरडा भात खात होते. आपल्या कुटुंबात नक्की काय झाले आहे, याची त्याला यत्किंचितही कल्पना नव्हती. आपल्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचीही त्याच्या बाळबोध मनाला कल्पना नसावी. मात्र, जातीची कवचकुंडले पांघरलेल्या पुढार्‍यांना आणि लोकप्रतिनिधींना याचे गांभीर्य काय कळणार? कारण, ही मंडळी फक्त मतदानापुरतीच जागी होतात. इतरवेळी आपल्या मतदारसंघात काय चालले आहे, त्याच्याशीही त्यांना काहीएक सोयरसुतक नसते.

​खामगाव हे फलटण तालुक्यातील एक गाव. या तालुक्यात विधान परिषदेचे माजी सभापती, माजी खासदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एक विद्यमान आमदार आहेत. परंतु एवढी मोठी दुर्घटना घडूनही यातील एकही माईचा लाल दुर्घटनास्थळी फिरकला नाही. विधिमंडळ अधिवेशनामुळे वेळच मिळाला नाही, असे सांगून काहीजण वेळ मारून नेतील. परंतु त्यांच्या जातीतील, भावकीतील, नात्यातील व्यक्तींबाबत अशी दुर्घटना घडली असती तर ते यायचे राहिले असते काय? गरिबाला वाली नसतो, हे खामगाव घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलेले आहे. ही राजकीय अनास्था भविष्यात प्रत्येकाच्याच मुळावर उठू शकते, हे ज्याने त्याने ताडले पाहिजे. शेवटी ते आले नाहीत, का? तर ते माझ्या जातीचे नाहीत, असा प्रश्न त्या दुर्दैवी परिवारातील जिवंत राहिलेल्या त्या पोटुशा माऊलीने विचारला तर आश्चर्य वाटायला नको.

- संग्राम निकाळजे, संपादक- सातारा टुडे. 

(सदरील लेख प्रस्तुत लेखकाने दि. ११ जुलै रोजी त्यांच्या फेसबुक वॉलवर प्रसिद्ध केला आहे. ) 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृष्णा पुलावर महिला पोलिस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे मायलेकाचे प्राण वाचले; तृप्ती वीर यांच्या धाडसाचे, सतर्कतेचे सर्वत्र कौतुक

संबंधित बातम्या