पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित; चांदोली-सह्याद्री प्रकल्पग्रस्तांचा हेळवाक येथे 'रास्ता रोको', वन कार्यालयांना ठोकले टाळे

by Team Satara Today | published on : 30 September 2026


पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनसह चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील मळे, कोळणे आणि पाथरपुंज या बाधित गावांतील प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत हेळवाक येथे जोरदार आंदोलन केले.

अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनांवर बोळवण होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मळे येथील वनसंरक्षक कुटी आणि हेळवाक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर आंदोलकांनी कराड-चिपळूण महामार्गावर हेळवाक चौकात 'रास्ता रोको' करून वाहतूक रोखून धरली.
पुनर्वसन संघर्ष समितीचे समन्वयक संजय यशवंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन सुरू झाले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय उदासीनतेमुळे पुनर्वसनाची प्रत्यक्ष कार्यवाही रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. आता केवळ पोकळ आश्वासने नकोत, तर थेट जमिनी व मोबदल्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. हेळवाक चौकातील रास्ता रोकोमुळे राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान संजय कांबळे यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामगावकर आणि उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांकडून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतर संजय कांबळे यांच्यासह बाधित गावांचे दोन प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील मासिक पुनर्वसन बैठकीत प्रत्यक्ष भूमिका मांडण्यासाठी रवाना झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मधुसूदन मोहिते यांना 'कै. रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान; ज्ञान हेच वैचारिक उत्क्रांतीचे मूळ साधन : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

संबंधित बातम्या