कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; तीन राज्यांवरील जलसंकट टळले

by Team Satara Today | published on : 24 August 2026


पाटण : पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण अखेर तुडुंब भरले असून धरणातील पाणीसाठ्याने १०० टीएमसीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

​या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील शेती, पिण्याच्या पाण्याचा आणि वीजनिर्मितीचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणात १ जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक जलवर्षात आतापर्यंत ११९.६० टीएमसी पाण्याची एकूण आवक नोंदवली गेली. यंदा सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात धरणात केवळ ०.६० टीएमसी पाणी आले होते; मात्र जुलै महिन्यात सुमारे ७५ टीएमसी आणि ऑगस्टमध्ये ४४ टीएमसी पाण्याची आवक झाली. १ जून रोजी धरणात अवघा १५.८८ टीएमसी साठा शिल्लक असल्याने प्रशासनाने पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती तसेच शेती व औद्योगिक वापर पूर्णपणे थांबवून केवळ पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवले होते.

​सध्या पाणीसाठा मुबलक झाल्याने वीजनिर्मितीलाही गती मिळाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी ५.८२ टीएमसी पाण्याचा वापर करून २८२.२२१ दशलक्ष युनिट वीज तयार करण्यात आली. पूर्वेकडे पिण्याच्या पाण्यासाठी १.३१ टीएमसी आणि पूरनियंत्रणासाठी सोडलेल्या १.७७ टीएमसी पाण्यावर १२.४६१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. अशा प्रकारे चारही जलविद्युत प्रकल्पांमधून आतापर्यंत एकूण ८.९० टीएमसी पाण्यावर २९४.६८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती पूर्ण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लॉकरवर विसरलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने केले प्रामाणिकपणे परत; जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेचे सर्वत्र कौतुक
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम

संबंधित बातम्या