कोयनानगर : कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून तो ९२ टीएमसीवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाला भेट देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. तसेच धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून पाण्याची आवक, सध्याचा साठा आणि विसर्गाबाबत तपशीलवार माहिती जाणून घेतली.
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातील साठा सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केली. धरण पूर्ण भरल्यानंतर पारंपरिक पाणीपूजन सोहळा पार पडेल, असे सांगतानाच त्यांनी धरण व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विसर्गाचे नियंत्रण प्रभावीपणे केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी नागरिकांना आवश्यक ती मदत करत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोयनेतील वाढता जलसाठा राज्याच्या जलसंपत्ती आणि वीजन निर्मितीसाठी दिलासादायक ठरत असला, तरी येणारे काही दिवस प्रशासकीय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
या पाहणीवेळी कोयना धरण व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व संबंधित विभागांचे मान्यवर उपस्थित होते.