नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी व विविध राजकीय संघटनांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या मोठ्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी आणि विविध संघटना ठाम होत्या. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दिल्लीतील जंतरमंतरवरून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह देशातील अनेक भागांत पसरले होते. देशभरात केंद्र सरकारविरोधात वाढता असंतोष आणि आंदोलनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता, अखेर केंद्र सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.