चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांची कारवाई; शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते अटकेत

by Team Satara Today | published on : 26 May 2026


नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव न मिळणे, निर्यातबंदी, साठेबाजी आणि अत्यावश्यक सेवा कायद्याच्या विरोधात चांदवड चौफुली येथील मुंबई-आग्रा महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या महामोर्चाला आज हिंसक वळण लागण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे विरोधकांकडून सरकार आणि पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

​चांदवड येथील या महामोर्चासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकार पोलिसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. अटक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे दुर्दैवी असून, आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे शेतकऱ्यांसाठी गुन्हा ठरत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नेत्यांच्या अटकेमुळे हा लढा थांबणार नसून, शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच आता मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या प्रशासकीय आणि राजकीय हालचाली सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

​या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. हे शेतकऱ्यांच्या ऐक्याचेच यश असल्याचे आंदोलक नेत्यांनी नमूद केले. मात्र, उद्याच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. यापुढील काळात निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला संपूर्णपणे सरकारच जबाबदार असेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

​या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा उत्पादकांच्या मागण्या निकाली न निघाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे चांदवड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड प्रशासनाला निर्देश

संबंधित बातम्या