डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; शिक्षेलाही स्थगिती

by Team Satara Today | published on : 18 August 2026


मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती दिली आहे.

​न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. यापूर्वी एप्रिल महिन्यात याच प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता सचिन अंदुरेला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सविस्तर माहिती घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.

​पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला पुणे पोलिसांकडे असलेला हा तपास २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. प्रदीर्घ सुनावणीनंतर १० मे २०२४ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या शिक्षेविरोधात दाखल अपीलावर सुनावणी करताना आता न्यायालयाने अंदुरेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी जलसंधारण सप्ताह; २१ ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर'

संबंधित बातम्या