मुंबई : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने पुकारलेल्या आंदोलनाचा फटका आज सर्वसामान्य मुंबईकरांना बसला. वरळी येथील 'डोम' परिसरात आयोजित जन आक्रोश महिला संमेलनामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महिला आरक्षणाचे विधेयक रखडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शक्तीप्रदर्शनासाठी महायुतीने महिला संमेलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे वरळी परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडलेल्या एका महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी धाव घेतली. तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर या महिलेने आपला संताप व्यक्त केला. "विरोध करायचा असेल तर मैदानात करा, लोकांना वेठीस धरून रस्ते का रोखता?" असा परखड सवाल करत तिने महाजन यांना सुनावले. यावेळी पोलीस आणि संबंधित महिला यांच्यातही शाब्दिक चकमक झाली.
या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडले. "केवळ हायकमांडला खूष करण्यासाठी जनतेला तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवले जात असेल, तर अशीच प्रतिक्रिया उमटणार," असे पवार यांनी म्हटले. तसेच, संबंधित महिलेवर कारवाई करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, या आंदोलनामध्ये महायुतीतील एकजूट नसल्याचेही समोर आले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी हे महायुतीचे आंदोलन असल्याचे जाहीर केले असतानाही, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला आघाडीने या मोर्चाकडे पाठ फिरवली. पक्षाकडून कोणतेही आदेश नसल्याचे सांगत या महिला नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही. त्यामुळे भाजपच्या या आंदोलनात केवळ त्यांच्याच कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली, तर मित्रपक्ष मात्र गायब असल्याचे पाहायला मिळाले.