मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राचा एक देदिप्यमान अध्याय आज संपला. दशकानुदशके आपल्या सुरांनी कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. शब्दांना मुकलेले आणि सुरांनी गहिवरलेले असे अत्यंत भावूक वातावरण आज मुंबईत पाहायला मिळाले.
आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या 'आशा ताईं'ना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, नीना गुप्ता, अभिनेता रितेश देशमुख, राकेश रोशन, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भय्याजी जोशी आणि विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अफाट संघर्ष आणि परिश्रमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात केवळ वाट्याला आलेली आव्हानात्मक गाणी त्यांनी आपल्या कौशल्याने अजरामर केली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. आर. डी. बर्मन, ओ. पी. नैय्यर, एस. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी दिलेली सदाबहार गाणी भारतीय संगीताचा अनमोल ठेवा आहेत. गझल, पॉप, शास्त्रीय आणि सुगम संगीत अशा सर्वच प्रकारांत त्यांनी आपली अष्टपैलू गायकी सिद्ध केली.
शिवाजी पार्क येथील अंत्यविधीवेळी वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. शब्दांनी व्यक्त होणे कठीण असताना गायक कलाकारांनी सुरांच्या माध्यमातूनच त्यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आशा ताईंसोबतच्या आठवणींना उजाळा देत "यहा कल क्या हो किसने जाना" हे गाणे गायले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध गायक शान यांनीही आपल्या सुरांनी या महान गायिकेला वंदन केले. सहा दशकांहून अधिक काळ मंत्रमुग्ध करणारा हा दैवी आवाज आज अनंतात विलीन झाला असला, तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपाने आशाताई कायम अजरामर राहतील.