छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर दोन भागांचा भव्य चित्रपट; भूषण कुमार, ऋषभ शेट्टी आणि संदीप सिंह एकत्र

२०२७ मध्ये चित्रीकरणाला सुरुवात; ‘द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ द्वारे उलगडणार स्वराज्याचा सुवर्ण इतिहास

by Team Satara Today | published on : 31 October 2026


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य जीवनकार्य आणि स्वराज्याची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी ‘द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ या दोन भागांच्या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, यासाठी निर्माते भूषण कुमार, अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि चित्रपट निर्माते संदीप सिंह एकत्र आले आहेत.
भारताच्या गौरवशाली इतिहासातील अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी टी-सिरीजने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विडा उचलला आहे.या विशेष सहकार्याचे औचित्य साधत निर्माते भूषण कुमार यांनी अभिनेता ऋषभ शेट्टी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे शंभर वर्षे जुने दुर्मिळ चित्र सप्रेम भेट देऊन आपला नितांत आदर व्यक्त केला. या भेटीतून महाराजांविषयीची अथांग श्रद्धा आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत करताना संपूर्ण चमूच्या खांद्यावर असलेल्या ऐतिहासिक जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे अधोरेखित होते.
अत्यंत भव्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साकारल्या जाणाऱ्या या दोन भागांच्या महाचित्रपटामधून शिवछत्रपतींच्या आयुष्यातील निर्णायक लढाया, स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, ऐतिहासिक विजय आणि आजवर फारसे समोर न आलेले अनेक महत्त्वाचे प्रसंग सविस्तरपणे उलगडले जाणार आहेत. महाराजांचे अद्वितीय युद्धकौशल्य, गनिमी काव्याची रणनीती, दूरदर्शी दृष्टिकोन, प्रजाहितदक्ष राज्यकारभार आणि स्वराज्याची परिवर्तनकारी संकल्पना या संपूर्ण कथानकाच्या केंद्रस्थानी असणार आहे. भारतीय इतिहासातील हा सुवर्ण अध्याय सर्व वयोगटांतील प्रेक्षकांपर्यंत प्रभावी सिनेमॅटिक अनुभवातून पोहोचवण्यासाठी भारत तसेच जगभरातील नामांकित तंत्रज्ञ आणि कलाकारांची भक्कम फळी या प्रकल्पाशी जोडली जात आहे.
या भव्य प्रकल्पाविषयी भावना व्यक्त करताना भूषण कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्राने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या जगाला अभिमान वाटावा असा अलौकिक वारसा दिला आहे. हा देदीप्यमान इतिहास जपणे आणि तो नव्या पिढीसह जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य मानतो. संदीप सिंह यांनी जेव्हा या चित्रपटाची मूळ संकल्पना मांडली, तेव्हाच ही असामान्य जीवनकथा रुपेरी पडद्यावर साकारण्याची प्रचंड जबाबदारी जाणवली. ऋषभ शेट्टी यांची अभिनय क्षेत्रातील असामान्य पकड आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांमध्ये प्राण फुंकण्याची त्यांची विलक्षण क्षमता पाहता या भव्य कलाकृतीसाठी अत्यंत योग्य टीम एकत्र आली आहे. छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि स्वराज्याचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असून, टी-सिरीजसाठी हा केवळ एक व्यावसायिक चित्रपट नसून युगपुरुषाला वाहिलेली विनम्र आदरांजली आहे.
सध्या या दोन भागांच्या ऐतिहासिक चित्रपटाच्या पूर्वतयारीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २०२७ च्या सुरुवातीला प्रत्यक्ष चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीज फिल्म्स प्रस्तुत ‘द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज फिल्म्स आणि लेजंड स्टुडिओज मिळून करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह करणार असून भूषण कुमार आणि कृष्ण कुमार मुख्य निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन ऋषी विरमानी आणि संदीप सिंह यांनी केले असून ऋषभ शेट्टी, शिव चनाना आणि कबीर सदानंद हे सहनिर्माते म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. हा चित्रपट केवळ इतिहासाची पुनर्मांडणी न ठरता संपूर्ण भारताला आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या स्वराज्याच्या मूल्यांचा आणि शिवरायांच्या अजरामर नेतृत्वाचा जागतिक पातळीवर गौरव करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाठार किरोलीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घूण खून; एका संशयितास अटक, खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या