पाचगणी : दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून पाचगणीजवळील भोसे (ता. महाबळेश्वर) येथे पुणे जिल्ह्यातील एका पर्यटक युवकाचा लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिंगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारहाण करणाऱ्या चार संशयितांना जेरबंद केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी आला होता. त्यांनी भोसे येथील अतिथी व्हिला हॉटेल येथे मुक्काम केला होता. बुधवारी रात्री अक्षयने मद्यप्राशन केले होते. त्याचे मद्यप्राशन अधिक झाल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली होती. काही वेळाने मित्र खोलीवर परत आले असता अक्षय खोलीत दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता खोलीच्या खालील बाजूस काही अंतरावर गर्दी आणि बॅटरीचा प्रकाश दिसून आला. त्यामुळे अक्षयच्या मित्रांनी तिथे धाव घेतली असता, सूर्यकांत गोळे याच्या घरात डोकावल्याच्या कारणावरून अक्षयला संशयितांनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याचे समोर आले. यावेळी अक्षयचे मित्र आणि स्थानिकांनी संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्यपान केलेल्या संशयितांनी कुणाचेही न ऐकता अक्षयला जबर मारहाण केली.
या जीवघेण्या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम पाचगणी व त्यानंतर वाई येथे हलवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांच्या सूचनेनुसार अक्षयला बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर विशाल अजित जाधव यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तो गुन्हा पाचगणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनूर, ता. वाई) आणि अमोल गणदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) या चार संशयितांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.