महाबळेश्वरनजीक आंबेनळी घाटात २०० फूट दरीत कोसळलेल्या पर्यटकाला ट्रेकर्सनी काढले सुखरूप बाहेर

by Team Satara Today | published on : 22 June 2026


महाबळेश्वर : महाबळेश्वर-प्रतापगड दरम्यान आंबेनळी घाटातील मेटतळे धबधब्याजवळ २०० फूट खोल दरीत कोसळलेल्या एका व्यक्तीला प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सने धाडसी कामगिरी करत सुखरूप बाहेर काढले. शनिवारी मेटतळे वॉटरफॉल परिसरात लघुशंकेसाठी गेला असता तोल गेल्याने हा पर्यटक थेट दरीत कोसळला होता.

​या घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याला याची कल्पना दिली. दरीतून जखमीला बाहेर काढण्यासाठी तात्काळ रेस्क्यू रोप आणि इतर आवश्यक साहित्याचा सेटअप उभारण्यात आला. बचाव पथकाचे सदस्य रोपच्या साहाय्याने दरीत उतरले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. काही वेळातच संबंधित व्यक्ती दरीत जखमी अवस्थेत आढळून आला. याच दरम्यान महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्यही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

​शनिवारी परिसरात झालेल्या पावसामुळे संपूर्ण दरीचा परिसर चिखलमय आणि निसरडा झाला होता. यामुळे जखमी व्यक्तीला वर आणताना बचाव पथकाला मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. अखेर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, दोन्ही बचाव पथकांनी स्ट्रेचर आणि रोपच्या साहाय्याने जखमी व्यक्तीला दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढले.

​या यशस्वी बचाव मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, अवि उतेकर, गणेश वागदरे, विक्रांत जाधव आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सोमनाथ वागदरे, सुजित कोळी, दीपक ओंबळे, श्रीकांत नाविलकर यांनी सहभाग घेतला. तसेच महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले. भर पावसात जीवाची बाजी लावून पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या या दोन्ही टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत दिल्लीतच तळ; कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दीपके यांचा निर्धार

संबंधित बातम्या