महसूल ची नसती उठाठेव; पाचगणीतील बंगला पाडकाम येणार अंगलट

by Team Satara Today | published on : 29 May 2026


पाचगणी : महाबळेश्‍वर तालुक्यातील गिरीस्थान असलेल्या पाचगणीतील सिडनी पॉईंट परिसरातील एका बांधकामावर तहसिलदार सचिन मस्के यांनी जेसीबी फिरवला असून न्यायप्रविष्ठ असलेले हे बांधकाम कोणत्याही नोटीशीविना पाडल्यामुळे महाबळेश्‍वर तहसिलदारांसह सातारा जिल्हाधिकारीही गोत्यात येणार आहेत. न्यायालयाचा अवमान केल्यामुळे महसूलची नसती उठाठेव आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

याबाबत माहिती अशी, आज दि. 29 रोजी पाचगणी येथील सिडनी पॉईंट परिसरातील वादग्रस्त बांधकामावर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महाबळेश्‍वरचे तहसिलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. तहसिलदारांसह डझनभर अधिकारी, पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या पाडकामामुळे पाचगणीमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांची-ज्यांची अनाधिकृत बांधकामे आहेत, अशांची या कारवाईमुळे पाचावर धारण बसली. आता पुढचा आपला तर नंबर नाही ना, असा कयास अनेकजण बांधत होते. मात्र सिडनी पॉईंट परिसरातील ते वादग्रस्त बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतर महसूलचे कर्मचारी, अधिकारी हात हलवत आल्या रस्त्याने परत गेल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, पाचगणीमध्ये शेकडो अनाधिकृत बांधकामे असताना केवळ त्याच न्यायप्रविष्ठ बाब असणार्‍या बंगल्यावर कारवाई का? ही नक्की सुपारी कोणी दिली? अशा चर्चाही पाचगणीमध्ये आज चर्चिल्या जात होत्या. दरम्यान, त्या वादग्रस्त मिळकतीचे मालक आणि गोव्यामध्ये शिपिंगचा व्यवसाय करणारे अनिल विजय मडगांवकर यांनी या कारवाईनंतर सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ प्रसारित करीत आपली बाजू मांडली.

यावेळी ते म्हणाले, संबंधित मिळकतीमधील बांधकामाबाबत वाद न्यायप्रविष्ठ आहे. संबंधित बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता बांधकाम पाडण्यात आल्यामुळे यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे झालेले आहे. जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत कटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेले आहे. येणार्‍या काळामध्ये जिल्हा प्रशासनाला कोर्टात खेचून जे काही पाडकाम केले आहे. त्याचा खर्च वसूल करणारच असा इशाराही मडगांवकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

सुपारीबाजी मुळे ‘महसूल’ बदनाम

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर आणि पाचगणी ही गिरीस्थाने सातारा जिल्ह्यामध्ये येतात. कधीकाळी ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असणारी ही दोन्ही शहरे शेकडो वर्षांपासून पर्यटकांची आकर्षण केंद्रे राहिलेली आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक पर्यटनासाठी याठिकाणी येत असतात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये स्थानिक तसेच बाहेरील काही लोकांनी या दोन्ही ठिकाणी बेसुमार अतिक्रमणे करुन बेकायदेशीर बांधकामे उभी केलेली आहेत. त्यामुळे येथील पर्यावरणावरही या सर्व गोष्टींचा परिणाम झाला आहे. मात्र, ही अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आधी मध्ये ठराविक लोकांच्या सुपार्‍या घेवून ठराविक लोकांच्या मिळकतींवर जेसीबी चालविण्याचे धाडस मात्र दाखवले जाते. एकाला एक व दुसर्‍याला एक असा दुजाभाव केल्यामुळे महसूल विभागाचे सुपारीकांड लपून राहत नाही. मात्र, कधीकधी शेरास सव्वाशेर मिळत असतो. आजचे पाचगणीतील पाडकाम मात्र जिल्हा प्रशासनाच्या चांगलेच अंगलट येणार असल्याची चर्चा पाचगणीसह संपूर्ण सातार्‍यात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग; राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

संबंधित बातम्या