दहिवडी: माण तालुक्यातील मलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या तीन इसमांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर, परिचारिका (नर्स) आणि शिपायाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करत रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांचीही तोडफोड केली. या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दहिवडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, दि. १९ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत यादव, परिचारिका स्वाती भुजबळ आणि शिपाई वैभव सिद्धेश्वर जंगम हे रात्रीच्या कर्तव्यावर हजर होते. याच दरम्यान ओंकार सोनमळे, रोहन शिंदे आणि योगेश जाधव हे तिघे जण एका अपघातात जखमी झाल्याचे सांगत उपचारासाठी रुग्णालयात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तात्काळ त्यांची तपासणी केली आणि जखमांवर प्रथमोपचार व ड्रेसिंग करून इंजेक्शन देण्याच्या सूचना संबंधित परिचारिकांना दिल्या.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार परिचारिका स्वाती भुजबळ यांनी रोहन शिंदे याला इंजेक्शन दिले. मात्र, त्याच वेळी त्याचा साथीदार ओंकार सोनमळे याने 'माझी पट्टी आधी करा' असा हेका धरत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेले शिपाई वैभव जंगम यांनी संबंधितांना शांत राहण्यास सांगितले. मात्र, याचा राग मनात धरून सोनमळे याने थेट जंगम यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांच्या डोक्यावर व मानेवर जबर मारहाण केली.
हा गंभीर प्रकार पाहून मध्यस्थी करण्यासाठी धावलेल्या परिचारिका स्वाती भुजबळ यांचाही हात पिरगळून संशयितांनी त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या परिचारिकेने मदतीसाठी वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांचा फोन हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयातील हा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत यादव हे तात्काळ त्या ठिकाणी आले. परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच, रोहन शिंदे याने डॉ. यादव यांच्यावरही हल्ला चढवून त्यांच्या कानशिलात मारली आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली.
या संपूर्ण राड्यात तिसरा संशयित योगेश जाधव यानेही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाच्या ऑक्सिजन मशीनला लाथा मारून मशीनचे नुकसान केले. शासकीय रुग्णालयात धुमाकूळ घातल्यानंतर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्यानंतर हे तिन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी रुग्णालयाचे शिपाई वैभव सिद्धेश्वर जंगम यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात ओंकार सोनमळे, रोहन शिंदे आणि योगेश जाधव यांच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.