लोणंद : लोणंद बायपासवर कारची काच फोडून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवार, दि. २२ जून रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे महामार्गावरील वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुणे येथील भेकराईनगर (फुरसुंगी) भागात राहणाऱ्या भाग्यश्री वैभव खोपडे या रविवारी सायंकाळी आपल्या पतीसह माळशिरस तालुक्यातील कोंडबावी येथून पुण्याच्या दिशेने मारुती सुझुकी बलेनो कारने निघाल्या होत्या. रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांची कार लोणंद बायपास परिसरात आली असता, चालक वैभव खोपडे यांनी शौचविधीसाठी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. ते वाहनापासून काही अंतरावर गेले असता, अचानक दोन अनोळखी तरुण कारच्या दिशेने आले. अनोळखी व्यक्तींना पाहून संशय आल्याने भाग्यश्री खोपडे यांनी तातडीने कारचे दरवाजे आतून लॉक केले. मात्र, चोरट्यांच्या टोळीने अत्यंत धाडस करत चालक बाजूची काच दगडाने फोडली आणि कारचे लॉक उघडले. त्यानंतर दुसऱ्या चोरट्याने कारचा दरवाजा उघडून भाग्यश्री यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून तोडली. दागिने हिसकावून घेतल्यानंतर दोन्ही चोरटे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या खळबळजनक प्रकारानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणंद पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.