कोरेगाव : जुने भांडण आणि पूर्ववैमनस्याच्या रागातून वाठार किरोली येथे एका तरुणावर चाकू व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करून त्याचा निर्घूण खून करण्यात आला. सतीश भगवान साळवे (वय ३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
वाठार किरोली (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडलेल्या या थरारक प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील एका संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी गोकुळ भगवान साळवे (वय २७, सध्या रा. कल्याण, जि. ठाणे; मूळ रा. वाठार किरोली) यांचा मोठा भाऊ सतीश भगवान साळवे याचे शुभम रमेश नलवडे (रा. वाठार) आणि त्याचा दाजी अक्षय पवार (रा. विटा, जि. सांगली) यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे दोघे सतीशच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाठार किरोली गावच्या हद्दीत वाठार ते आर्वी जाणाऱ्या रस्त्यावर सतीश साळवे असताना संशयितांनी संगनमत करून त्याला गाठले. जुन्या वादाची कुरापत काढून हल्लेखोरांनी सतीशवर थेट हल्ला चढवला. संशयितांनी जवळ असलेल्या चाकूने सतीशच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर एकामागून एक गंभीर वार केले. त्यानंतर लोखंडी पाईपने त्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. या भीषण व प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सतीशचा जागीच मृत्यू झाला.
या रक्तरंजित घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी या प्रकरणी अधिकृत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अक्षय पवार (रा. विटा, जि. सांगली) याला ताब्यात घेतले असून फरार असलेल्या दुसऱ्या संशयित आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे आणि पोलीस उपनिरीक्षक एम. एम. खान यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास रहिमतपूर पोलीस करत आहेत.
वाठार किरोलीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घूण खून; एका संशयितास अटक, खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा