कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण विद्यालयात परिसरातील गावांमधून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 5 वाजता एस. टी. बस फेरी सुरु करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबडेकर) सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहूल वाघांबरे यांनी केली आहे. अनेक वेळा मागणी करुनही बस फेरी सुरु होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
यावेळी रिपाइंचे अमोल मोरे व पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत कोरेगाव आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण विद्यालयात पिंपोडे परिसरातील सोळशी, नादंगाव, नायगाव, सोनके गावांमधून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळा पावणे पाच वाजता सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वेळेत बस फेरी नसल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सायंकाळी घरी पोहोचण्यास उशीर होत असतो. याबाबत यशवंतराव चव्हाण विद्यालयानेही अनेकवेळा एस. टी. फेरी सुरु करण्याबाबत मागणी केलेली आहे. मात्र, कोरेगाव आगाराकडून याबाबत दखल घेतली जात नाही. त्यामुळे रिपाइंने निवेदन दिले आहे.
या मागणीची तातडीने दखल घेवून या विद्यार्थ्यांसाठी 5 वाजता एस. टी. फेरी सुरु करावी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी. पिंपाडेहून सोळशीपर्यंत जाण्यासाठी वाठार-वाई ही गाडी सायंकाळी 7.30 वाजता येते. परंतू गाडी येण्याची दररोजची वेळ निश्चित नसतेतसेच ती कधी कधी येत नाही. त्यामुळे आमच्या मुलांचा जाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांनी ही मागणी केली असून याबाबत दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल.