हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून खंडाळ्यात युवकावर चाकूने हल्ला; मुख्य संशयिताला पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 14 September 2026


खंडाळा  : हॉटेलच्या बिलावरून दुपारी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी खंडाळा बस स्थानक परिसरातील मद्यविक्री दुकानाबाहेर गौरव राजेंद्र शिंदे (वय २३, रा. पारगाव, ता. खंडाळा) या युवकावर चाकूने नऊ वार करून गंभीर जखमी करण्यात आले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी मुख्य संशयित अभिषेक चौधरी याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे, त्याचा मित्र ऋषिकेश कांबळे आणि सद्दाम शेख हे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी हॉटेलमध्ये जाणार होते. मात्र, जाण्यापूर्वीच त्यांच्यात हॉटेलचे बिल कोण भरणार यावरून जोरदार वाद झाला. या वादानंतर सद्दाम शेख तेथून निघून गेला. दरम्यान, रात्री पावणेअकराच्या सुमारास गौरव शिंदे बस स्थानक परिसरातील एका बारमधून लघुशंकेसाठी बाहेर आला असता, मागून आलेल्या अभिषेक चौधरी (रा. घाडगेवाडी, ता. खंडाळा) याने त्याची ओळख पटवून अचानक हल्ला चढवला. ‘तू मला ओळखत नाहीस का, आता सापडलास,’ असे म्हणत त्याने गौरवच्या दोन्ही खांद्यांवर आणि मांडीवर चाकूने सपासप नऊ वार केले. गौरवने रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरडा करत मित्रांच्या दिशेने धाव घेतल्याने हल्लेखोर तेथून पसार झाला.
मित्रांनी तातडीने गंभीर जखमी गौरवला खंडाळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुपारी सद्दामसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून त्याचा भाऊ अब्दुल शेख याच्या सांगण्यावरून अभिषेकने हा जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गौरव शिंदेच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात अभिषेक चौधरी, अब्दुल शेख आणि सद्दाम शेख (दोघे रा. बावडा, ता. खंडाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित अभिषेक चौधरी याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (दि. १५) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार धापते करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अतित गावच्या हद्दीत महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोन्ही दरवाजे तुटले

संबंधित बातम्या