लोणंद : लोणंद-फलटण मार्गावरील तरडगाव पुलाजवळ शुक्रवारी रात्री दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र साहेबराव क्षीरसागर (वय ४०, रा. गोटेमाळ, लोणंद) आणि अभिषेक धनंजय कणसे (वय २४, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अलंकार सूर्यकांत फडतरे (वय २४, रा. घाडगे कॉलनी, लोणंद) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तरडगाव हद्दीतील पुलाच्या पश्चिम बाजूस हा अपघात घडला. कारचालक सचिन वसंत काशिद (रा. काशिदवाडी, ता. फलटण) हा त्याच्या ताब्यातील कार (क्र. एमएच १२ झेडसी ६५२७) भरधाव आणि निष्काळजीपणे फलटणच्या दिशेने चालवत होता. याच दरम्यान त्याने समोरील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील क्षीरसागर आणि कणसे यांचा जागीच मृत्यू झाला, तर फडतरे हा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर चालक सचिन काशिद याने जखमींना उपचारासाठी दाखल न करता किंवा घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी संतोष साहेबराव क्षीरसागर यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, फरार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि लोणंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे करत आहेत.