कराड : घरगुती वादातून जन्मदात्या आई-वडिलांनी आणि भावाने मिळून एका तरुणाच्या डोक्यात स्टूल घालून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे उघडकीस आली आहे. धनाजी सत्यवान अदलिंगे (वय ३५, रा. गोळेश्वर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह सोनसळ घाटात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी वडील सत्यवान तुकाराम अदलिंगे, आई सुरेखा आणि भाऊ लक्ष्मण अदलिंगे या तिघांना अटक केली आहे.
चार दिवसांपूर्वी सोनसळ घाटात पोलिसांना अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह मिळून आला होता. मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताचा संशय आल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि अमित पवार यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तो मृतदेह गोळेश्वर येथील धनाजी अदलिंगे याचा असल्याची ओळख पटवली.
तपासादरम्यान कुटुंबातील अंतर्गत वादाचा संशय आल्याने पोलिसांनी मृताच्या आई-वडिलांसह भावाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. धनाजी सातत्याने घरातील सदस्यांना त्रास देत असल्याने घरात वारंवार वाद होत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून आई, वडील आणि भावाने संगनमत करून आठवड्याभरापूर्वी त्याच्या डोक्यात लाकडी स्टूलने जबर प्रहार करून त्याला ठार केले. त्यानंतर घाबरलेल्या तिघांनी स्वतःच्या मालवाहू मिनी टेम्पोतून मृतदेह नेऊन सोनसळ घाटात फेकून दिला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील व पथकाने चाणाक्षपणे तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला.
आई-वडिलांसह भावानेच केला सख्ख्या भावाचा खून; गोळेश्वर येथील धक्कादायक घटना, तिघांना अटक
by Team Satara Today | published on : 24 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा