कौटुंबिक वादातून कराडमध्ये पतीकडून पत्नीचा धारदार शस्त्राने खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 10 August 2026


​कराड : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने प्राणघातक वार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कराड शहरातील डुबलनगर परिसरात घडली. रोहिणी दत्तात्रय जांभळे असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी संशयित पती दत्तात्रय नारायण जांभळे (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

​रविवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास दत्तात्रय आणि रोहिणी यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद सुरू झाला होता. या वादाचे पर्यावसान विकोपाला जाऊन हाणामारीत झाले. याच दरम्यान दत्तात्रय याने घरातील धारदार शस्त्राने रोहिणी यांच्यावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा जागीच मृत्यू झाला.

​घटनेची माहिती मिळताच कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखिल मगदूम आणि अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी संशयित पती दत्तात्रय जांभळे याला ताब्यात घेतले असून, खुनामागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यात मांजा ठरला गांजापेक्षा घातक
पुढील बातमी
पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विकास कामांचा आढावा

संबंधित बातम्या