कराडात अवैध अग्नीशस्त्र विक्रीचा डाव हाणून पाडला

कराड शहर पोलिसांची कारवाई; चौघे जेरबंद, चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त

by Team Satara Today | published on : 11 July 2026


कराड : कराड शहरात बेकायदा अग्निशस्त्रांचा काळाबाजार फोफावत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, विक्रीसाठी आणलेली चार देशी बनावटीची पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करत कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चौघांना अटक केली. या कारवाईत सुमारे 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागील ईदगाह मैदान परिसरात सापळा रचण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकत संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या कारवाईत अफताब बादशाह मोमीन (24, मुजावर कॉलनी, कराड), रेहान मेहबूब शेख (19, मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (23, काले, ता. कराड) आणि ओंकार प्रकाश हिंगणे (25, येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चार देशी बनावटीची पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

प्राथमिक तपासात ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले असून, ती नेमकी कुठून आणली गेली, कोणाला विकली जाणार होती आणि या व्यवहारामागे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राधिका चौकात दोन वाहनांची जोरदार धडक, दोघे जखमी
पुढील बातमी
2029 ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग

संबंधित बातम्या