कराड : संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय संपादन केला आहे.
अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचा पूर्णपणे धुव्वा उडवला. मुख्य लढतीत डॉ. सुरेश भोसले यांनी १४,७३४ मतांची मोठी आणि निर्णायक आघाडी घेत कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, या विजयामुळे त्यांनी कारखान्याच्या सत्तेत आपली विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.२६ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून कराड येथील कार्वे नाका परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी साडेसात हजार मतांची स्पष्ट आघाडी घेत आपली विजयाची दिशा निश्चित केली होती. दुपारनंतर दुसऱ्या आणि अंतिम फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी अंतिम निकाल अधिकृतपणे घोषित केला. अंतिम मतमोजणीत डॉ. सुरेश भोसले यांना तब्बल २४,८०९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार अविनाश मोहिते यांना अवघी ११,४१४ मते मिळवता आली, ज्यामुळे भोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
निकाल जाहीर होताच कराड शहर, रेठरे बुद्रुक तसेच कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात भोसले समर्थकांनी आणि सभासदांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिशबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरत प्रचंड जल्लोष केला. गावोगावी विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झालेल्या सहकार पॅनेलच्या संचालकांमध्ये धोंडिराम शंकरराव जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, आनंदा सोपान खबाले, अरविंद गुणवंतराव पाटील, दयाराम भीमराव पाटील, बाजीराव नारायण थोरात, दत्तात्रय हनुमंत देसाई, लिबाजी महिपतराव पाटील, संभाजीराव आनंदराव पाटील, जयवंत दत्तात्रय मोरे, सत्यजित जितेंद्र पाटील, सुनील भीमराव पाटील, संग्राम विश्वासराव पाटील, बाबासो खाशाबा शिंदे, सुरेश जयवंतराव भोसले, बाजीराव दाजी निकम, सुजाता दीपक जाधव, सुनिता संजय शेवाळे, छबन जगन्नाथ कांबळे, अविनाश मधुकर खरात आणि बाळासो आकाराम जगताप यांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी हा विजय मागील ११ वर्षांतील पारदर्शक कारभार, उल्लेखनीय विकासकामे आणि सभासदाभिमुख योजनांवर जनतेने दाखवलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगत सर्व सभासदांचे आभार मानले. तसेच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाळ भोसले यांनी हा विजय कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठे मताधिक्य असून येत्या पाच वर्षांत विकासाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडून सभासदांसाठी अधिक प्रभावी आणि कल्याणकारी योजना राबविण्याचा आमचा ठाम निर्धार असल्याचे स्पष्ट केले. या एकतर्फी विजयामुळे २०१४ पासून कारखान्यावर असलेले डॉ. सुरेश भोसले यांचे सक्षम नेतृत्व आणि पकड अधिक मजबूत झाली आहे.